Tag Archives: घोटाळा

सुरेश कलमाडी यांना सीबीआयने केली अटक

सुरेश कलमाडी यांना सीबीआयने केली अटक

सुरेश कलमाडी यांना सीबीआयने केली अटक

बहुचर्चित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळाप्रकरणी आयोजन समितीचे माजी अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांना आज सीबीआयने अटक केली. त्यांच्याविरुद्ध कथितपणे एक कंत्राट सुनियोजितरीत्या अव्वाच्या सव्वा किमतीत १४१ कोटी रुपयांमध्ये एका स्वीस कंपनीला दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिस्तभंग कारवाई समितीने (डीएसी) कलमाडींना तडकाफडकी पक्षातून निलंबित केले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याप्रकरणी आयोजन समितीचे माजी अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी यांच्या अटकेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अण्णा हजारे यांनी कलमाडी यांना खासदारकी सोडण्याचे आवाहन केले. तसेच या घटनेमुळे न्याय व्यवस्थेवरील आमचा विश्वास दुणावला आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रकुलसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घोटाळा केल्याप्रकरणी खासदाराला अटक होण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. सीबीआय मुख्यालयात दिवसभर चाललेल्या चौकशीनंतर सायंकाळी ४ वाजता त्यांना अटक करण्यात आल्याचे जाहीर केले. गेल्या डिसेंबरपासून आतापर्यंत चौथ्यांदा तपास संस्थेने त्यांची चौकशी केली. कलमाडींना ‘टायमिंग स्कोरिंग रिझल्ट सिस्टम’साठी (टीएसआर) स्वीस कंपनी ‘स्वीस टायमिंग’ला कंत्राट देण्यात अवलंबिलेल्या गैरप्रकाराबद्दल विचारणा करण्यात आली. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक टीएसआरचे कंत्राट स्वित्झर्लंडस्थित एका खासगी कंपनीला १४१ कोटी रुपये एवढ्या चढ्या किमतीत दिल्याच्या संदर्भात कलमाडींना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रकुल आयोजन समितीच्या अधिकाऱ्यांनी सदर कंपनीच्या प्रतिनिधींसोबत षड्यंत्र रचले आणि सुनियोजितपणे अन्य पुरवठादारांना रोखले तसेच वाममार्गाने प्रतिस्पर्धा संपवून टीएसआरसाठी कंत्राट दिले, असा आरोप आहे. टीएसआरसाठीच्या संभाव्य बोलीदारांची यादी बनविण्यासाठी स्थापलेल्या समितीत ‘निवडक’ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. कलमाडींना उद्या विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांना पुढील चौकशीकरिता १४ दिवस आपल्या कोठडीत देण्याची मागणी सीबीआय न्यायालयाकडे करू शकते. याच टीएसआर कंत्राट घोटाळाप्रकरणी सीबीआयने आज राष्ट्रकुल आयोजन समितीमधील अधिकारी सुरजित लाल आणि ए.एस.व्ही. प्रसाद यांनाही अटक केली.