Tag Archives: चंद्रपूर

राज ठाकरे यांनी शासनाविरुद्ध फोडली डरकाळी

‘ताडोबात जे वाघांची शिकार करतात त्या शिकार्‍यांची शिकार करणार्‍या किंवा जिवंत पकडणार्‍या अधिकार्‍यांना माहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाच लाखांचा पुरस्कार देण्यात येईल’, अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नागपुरात केली. राज ठाकरे यांनी असे स्पष्ट केले की, सर्रास होणार्‍या वाघांच्या शिकारीवर कुठलाच तोडगा न काढणार्‍या व झोपलेल्या शासनाविरुद्ध ही डरकाळी फोडली आहे. पुरस्काराची रक्कम देतांना मात्र शासनासारखा विलंब अजिबात होणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. राज ठाकरे यांनी ही माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. जे नागरिक किंवा जे खबरे वाघांची शिकार करणार्‍यांबद्दल माहिती देतील, त्यांनाही मनसेतर्फे दोन लाखांचा पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली. वाघांच्या शिकारीसाठी शासनाविरुद्ध राज ठाकरे यांनी ताडोबा दौर्‍यावरून परतताच तोफ डागली.

‘प्रशासनाचा घोळ, वन्य प्राण्यांबाबत राज्य सरकारला जाणीव नसणे, ही मूळ कारणे वाघांची शिकार होण्यासाठी कारणीभूत आहेत. त्याला जबाबदार असणार्‍या अजून काही गोष्टी म्हणजे, व्याघ्र प्रकल्पात राजकीय हस्तक्षेप, अधिकार्‍यांवरील दडपण. शिकार वन अधिकारी तसेच स्थानिकांच्या मदतीशिवाय अशक्य आहे’, असे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी ‘बफर झोन’बाहेरही सुरक्षेच्या उपाययोजना आवश्यक असल्याचे शिकार रोखण्यासाठीचे उपाय सुचविताना सांगितले.

‘चंद्रपूर जिल्हा वनासाठी प्रसिद्ध आहे व हे असतानाही तेथे खाणीचे प्रकल्प येत आहेत. या गोष्टीचा परिणाम वाघांसह तिथल्या नागरिकांच्या जीवनावरही होत आहे. वन पर्यटनाला चालना देणे गरजेचे आहे कारण येथे वनक्षेत्र भरपूर आहे. त्यामुळे जंगल व वन्यप्राणीही वाचतील, मात्र वनजीवन लाटण्याकडेच जास्त लक्ष दिले जात आहे,’ असा आरोप देखील त्यांनी केला. सावरासावर करण्यासाठी आपला दौरा ठरल्यानंतर मंत्र्यांनीही लगेच दौरा केल्याचा राज ठाकरे यांनी टोमणा लगावला.