Tag Archives: चप्पल

चप्पल दुरुस्तीचे दुकान

रामदेवांनी आपला होता नव्हता तो पैसा आपल्या एकुलत्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करुन त्याला भरपूर शिकवलं; त्याला एक मोठी सरकारी नोकरी मिळताच त्याचं लग्न करुन दिलं. आणि स्वत: ते निष्कांचन स्थितीत मुलाजवळ राहू लागले.

श्रीमंताच्या मुलीशी लग्न होताच व लवकरच कलेक्टरच्या जागेवर भरती होताच, मुलगा घनश्याम बापाला विसरला. त्याला आपल्याकडे येणाऱ्या मोठ्या मोठया लोकांना आपले साधेसुधे व जुन्या काळातील वडील, हे आपले वडील असल्याचे सांगण्याचीही लाज वाटू लागली. एके दिवशी तर त्याने बायकोच्या नादी लागून, आपल्या वडिलांना घराबाहेर हाकलून दिले !

पण आता जगण्यासाठी दारोदार भिक्षा मागण्याखेरीज दुसरा मार्ग नसल्याने, आणि तो मार्ग अवलंबणे रास्त नसल्याने, रामरावांनी एक कडक युक्ती आमलात आणण्याचे ठरविले. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या एका मोच्याकडून चप्पल दुरुस्तीची हत्यारे व काही चामड्याचे तुकडे घेतले आणि एका मित्राच्या मुलाकडून एक ‘पाटी’ रंगवून घेतली.

एवढी तयारी झाल्यावर आपला कलेक्टर मुलगा आता ज्यात रहात होता, त्या सरकारी बंगल्यासमोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या सावलीत रामरावांनी मोच्याचे दुकान थाटून, तिथे ते बसले आणि दुकानावर फ़लक लावला- ‘रावबहाद्दूर घन:श्याम यांचे कफ़ल्लक वडील रामराव, यांचे चप्पल दुरुस्तीचे दुकान !’

तो फ़लक झळकताच कलेक्टरसाहेब वडिलांकडे धावत येऊन व हात जोडून त्यांना म्हणाले, ‘बाबा! झाले ते झाले. यापुढे असे होणार नाही.’

असे म्हणून ते आपल्या वडिलांना सन्मानपूर्वक घरी घेऊन गेले व त्यांना चांगले वागवू लागले.