Tag Archives: चिंचपोकळी

स्वर्गातले गणपती आर्टस

लालबागचा राजा २०११

लालबागचा राजा २०११

देवाने माणसाला बनवले की माणसाने देवाला बनवले, हा प्रश्‍न मला नेहमी पडतो. जेवढी गरज भक्ताला देवाची असते तेवढीच गरज देवालाही भक्ताची असावी, नाही का? लहानपणापासून आपण ऐकतो की, देवाने माणसाला किती कलाकारीने बनवले आहे. नाक, डोळे, कान किती कष्ट घेतले असतील त्याने आपल्याला बनवण्यात? कसे बनवले असेल त्याने? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मला मिळाली चिंचपोकळीतील कांबळी आर्टस् येथे. देवाने माणसाला ज्या कारखान्यात बनवले तोही असाच असावा. वेगवेगळ्या उंचीचे गणपती नजर जाईल तिथे दिसतात. अचानक सर्व देवांचे लक्ष आपल्यावर पडल्यासारखे वाटते. भक्तांची गर्दी असतेच. त्यात कांबळी परिवारातील सदस्य इथे-तिथे धावताना दिसतात. काही गणपती सजवण्यात मग्न असतात तर काही गणपती घ्यायला आलेल्यांचे स्वागत करतात. आपल्या गोड हास्याने आलेल्यांना नमस्कार करणारे म्हणजे रत्नाकर मधुसूदन कांबळी. ७ नोव्हेंबर १९४१ मध्ये यांचा जन्म झाला. कलाकारांचा एरिया समजल्या जाणार्‍या लालबाग येथेच त्यांनी पहिला श्‍वास घेतला. आईने दूध आणि वडिलांनी कला पाजून मोठे केलेल्या रत्नाकर कांबळींनी अगदी बालपणापासूनच मूर्तींमध्ये आपले जगणे लोटले. वडील मधुसूदन कांबळी यांना फक्त पाहून तर आपल्याहून १० वर्षे मोठे बंधू व्यंकटेश कांबळी यांच्या हाताखाली काम करून त्यांनी शिल्पकलेचा अभ्यास केला. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मधून कमर्शियल आर्टिस्टचा कोर्स करून बाहेर कामही केले पण गणपती बनवणे हे काम नसून प्रार्थनाच समजून त्यांनी घराण्याची कला पुढे चालवली आहे.

लालबागचा राजा २०११ प्रथम दर्शन

लालबागचा राजा २०११ प्रथम दर्शन

त्यांचे वडील सदाशिव मुंडगेकरांचे शिष्य. १९३४ साली पहिला लालबागचा राजा मधुसूदन कांबळी यांनी केला. खरं तर हाच गणपती १९३२ पासून लालबाग येथील पेरू कम्पाऊंडमध्ये बसवला जायचा. कोळणींना, स्त्रियांना, त्या कम्पाऊंडमध्ये वावरणारे मुसलमान खूप त्रास देत. त्या स्त्रियांनीच नवस केला की, ‘देवा आम्हाला दुसरी जागा हवी तुला बसवण्याकरिता’. दोन वर्षांत ‘राजा’ला त्याची जागा मिळाली. तेव्हापासून लालबागचा राजा त्याच ठिकाणी दरवर्षी बसतो. १९५२ साली वडिलांचे निधन झाले. लालबागचा राजा दरवर्षी वडीलच बनवायचे पण ते हातून गेले. मोठे बंधू व्यंकटेश तयार होतच होते हे काम सांभाळण्याकरता. लगेच ते काम परत बंधूंनी मिळवले व कांबळी परंपरा सुरू झाली. रत्नाकर कांबळी यांनी गणपती मूर्ती बनवण्यातील सर्व बारकाई आपल्या भावाकडून शिकून घेतली. त्यांच्या मूर्तीतील सर्वात महत्त्वाचे ते गणपतीचे डोळे. अनेक लोक रत्नाकर कांबळींकडून जुन्या गणपतीचे डोळे रंगवून घेण्याकरिता येतात. वेळेचे बंधन असल्यामुळे सर्वांनाच खूश नाही करता येत याचे त्यांना वाईट वाटते. त्यांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की, गणपतीचा चेहरा हा हत्तीचा जरी असला तरी त्यावर मानवी भाव दिसतात. सुंदर, सोज्वळ व तेजवंत चेहरा म्हणजे कांबळींचा गणपती. मुख्य म्हणजे तो चेहरा दरवर्षी तसाच असतो. साच्यात जरी काढला असला तरी रंगकामाला कोणताही साचा नसतो. यालाच कला म्हणतात. २००२ साली स्वत: त्यांनी लालबागचा राजा केला. भाऊ चालण्या-फिरण्याच्या परिस्थितीत नसल्यामुळे त्यांना उचलून राजाचे काम दाखवण्याकरता नेण्यात आले. वडिलांची आणि भावाची तपश्‍चर्या व आशीर्वाद याच पाठबळावर ही कला आज त्यांना जिवंत ठेवता आली आहे असे ते सांगतात. गणपती बाप्पाची कृपा म्हणून आज त्यांची तीनही मुले हा वारसा आणखी पुढे नेण्यास उत्सुक आहेत.  १९७५ चा संतोष, १९७८ चा सईष आणि १९८० चा संदेश हेदेखील संपूर्णपणे गणपतीमय झालेले वाटतात. १९८१ मध्ये रत्नाकर कांबळी यांच्या पत्नीचे निधन झाले. ७ महिन्यांच्या संदेशला सांभाळण्यापासून, संतोष-सईषच्या शाळेपासून ते गणपती बाप्पाच्या मूर्तीकलेपर्यंत सर्व काही जोपासण्यात रत्नाकर कांबळींची धावपळ होत होती. पण आज तीच तीन पोरं त्यांचा आधार आहेत. पोरांचे व्यवसाय वेगळे आहेत पण परंपरा चालवण्याची जिद्द त्यांना एकत्रित करते. संतोषने सर्व ओझे आपल्या खांद्यावर घेतले आहे. दादाच्या मदतीला सईष आणि संदेशही जीव ओततात.

रत्नाकर कांबळींचाच गणपती हवा म्हणून रांग लागते. पण गणपती बनवणे हा त्यांचा धंदा नसून कला असल्यामुळे ते फार थोड्याच मूर्ती बनवतात. प्रत्येक मूर्तीवर लक्षपूर्वक काम केले जाते. गणपतीचे भाव, डोळे व चेहरा यांचे काम फक्त कांबळी कुटुंबीयच करतात ही त्यांची प्रथा आहे. कुणी ‘‘प्लीज, प्लीज’’ करून तर कुणी धमक्या आणि मोठी नावे घेऊन त्यांचा गणपती मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण यावर ते हसत सांगतात, ‘‘बाप्पाला ज्यांच्या घरी जायचे तिथेच तो जातो. मी काहीच करत नाही. तोच काय ते करतो.’’ एकदा लालबागचा राजाची स्थापना केली की मग कांबळी दर्शनाला जात नाहीत. काहींना त्यांनी बनवलेल्या लालबागचा राजाच्या छोट्या आवृत्त्या घरी स्थापन करण्याचे सौभाग्य मिळते. ते सांगतात, ‘सर्वांना पुरून उरत नाही मी याची मला खंत वाटते’. पण जास्तीत जास्त लोकांना आनंद व समाधान मिळावे याची मी काळजी घेते. १२ फूट उंचीच्या लालबागचा राजाच्या मुकुटाचा कळस काढता येतो व मागचे प्रबळ ही फोल्ंिडग आहेत मला यांच्याकडून कळले. ब्रीजच्या खालून गणपती नेताना सोय म्हणून असे केले आहे. लालबागच्या छोट्या गल्लीला लक्षात ठेवूनच कांबळी आपले काम करतात.

२००७ साली गणपतीच्या दुसर्‍या दिवशी त्यांना हार्टऍटॅक आला. हिंदुजा इस्पितळात त्यांच्यावर उपचार झाले. त्याचवेळी भाईंदरला ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मरायला टेकलेल्या परागलाही त्याच इस्पितळात ठेवले होते. सर्वांना ‘खेळ संपलाय’ असे सांगून टाकले होते. परागच्या बाबांनी कांबळींना सांगितले, ‘लालगाबचा राजा सर्वांचे ऐकतो असे कळले, सांगाना आमच्या परागला जगवायला.’ गणेश चतुर्दशीला कांबळी उपचार करून घरी परतले. घराच्या गॅलरीतून लालबागचा राजा विसर्जनाला जाताना पाहून कांबळी हळूच पुटपुटले, ‘‘परागला आताच छोटीशी पोरगी झाली आहे, तिचा बाप तिला मिळू दे रे राजा’’. संपलेला खेळ पुन्हा सुरू झाल्यासारखा पराग आज जगत आहे. असे अनेक अनुभव कांबळी सांगतात व आपण ही ऐकतो. आता त्यांनी त्यांच्या मूर्तींना कॉपीराईट घेतले आहे. खूप जणांनी यावर टीका केली. ‘गणपतीवर कसला कॉपीराईट लावता’, असेही म्हणून झाले. पण रत्नाकर कांबळींचे सुपुत्र संतोष यांचे म्हणणे आहे, ‘गणपतीचा चेहरा ही आमची पारंपरिक कला आहे. साच्यातून काढलेल्या गणरायाच्या चेहर्‍याला वाटेल तसा रंग फासून हवे तसे त्याचा बाजार मांडणे हा आमच्या कलेचा अपमान वाटतो आम्हाला. पी.ओ.पी.च्या गोळ्यापासूनच आम्ही त्याला देव मानून त्याला मान देतो. आमच्या साच्यातून गणपती बाप्पाचा अपमान कुणी करू नये म्हणून आम्ही कॉपीराईट घेतला आहे. धंदा करणार्‍यांनी आमच्या कलेचा वापर करून देवाला बाजारात वस्तू म्हणून बसवू नये हीच इच्छा.’ रत्नाकर कांबळी सांगतात, शेवटी देव सगळीकडेच असतो. मी माझ्या कलेच्या उपासनेत त्याला शोधतो.

खरंच देव सगळीकडेच असतो. फक्त पाहण्याची इच्छा हवी. दगडात ही देव दिसतो किंवा ठरवले तर देवात ही दगडच दिसेल. देवाला माणूस बनवताना पाहण्याची संधी मिळणार नाही कदाचित. पण माणसाला देव बनवताना पाहून खूप आनंद झाला. देव बनवणार्‍याच्या तोंडावर देवाचेच तेज दिसते. चिंचपोकळीच्या कांबळी आर्टस्मध्ये मी देव बनताना पाहिले. स्वर्गात कदाचित अशाच गणपती आर्टस्मध्ये आपण बनले असू. गणपती बाप्पा मोरया…!!!