Tag Archives: चिंच

अरण्य आणि लाकूडतोडया

एक लाकूडतोडया एके दिवशी रानांत गेला असता, इकडेतिकडे पाहात रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्यास विचारले, ‘तू का रडतोस ? तुला काय पाहिजे ?’ तो म्हणाला, ‘माझ्या कुऱ्हाडीस दांडा नाही, याकरिता लाकडाचा एक लहानसा तुकडा मला दयाल तर बरे होईल.’ हे ऐकून झाडांस त्याची दया आली व त्यांनी त्यास चिंचेच्या चिवट लांकडाचा एक तुकडा दिला. लाकूडतोडयाने तो आपल्या कुऱ्हाडीस घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा चालविला. तेव्हां सागवानाचा वृक्ष इतर वृक्षांस म्हणतो, ‘गडे हो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. येथे दुसऱ्यास नाव ठेवण्यास जागा नाही.’

तात्पर्य:- शत्रूची कींव करून जो त्यास साहित्य पुरवितो, तो बहुधा शेवटी पश्चात्ताप पावतो. शत्रूवर उपकार करावा, त्याचे अन्याय क्षमा करावे, यांत थोरपणा आहे ही गोष्ट खरी, पण जेणेकरून आपला शत्रू बलवान्‌ होऊन आपणास उपद्रव करील, अशा प्रकारचे साह्य त्यास देणे, हा मूर्खपणा होय.