Tag Archives: चिठ्ठी

जशास तसे

एका खवचट गृहस्थाने बाहेरगावच्या एका ओळखीच्या माणसाला तिकीट न लावलेल्या लिफ़ाफ़्यातून एक पत्र पाठविले.ज्याला तो लिफ़ाफ़ा पाठविला गेला, त्याने पोस्टमनकडे जरुर ते पैसे भरुन तर लिफ़ाफ़ा सोडवून घेतला व उघडला. उघडून पाहतो तो आतल्या कागदावर लिफ़ाफ़ा पाठविणाऱ्या गृहस्थानं ‘आम्ही सर्व खुशाल आहोत’ एवढाच मजकूर लिहिलेला !

ज्याला तो लिफ़ाफ़ा सोडवून घेण्यासाठी नाहक भुर्दंड बसला होता, त्याने काही दिवस निघून गेल्यानंतर त्याच खोडसाळ गृहस्थाच्या नावावर पोस्टाने एक पार्सल एक पाठवून दिले. त्याने त्या पार्सलाच्या माथ्यावर तिकिटे लावण्याचे मुद्दाम टाळले होते.

त्या गृहस्थाकडे ते पार्सल पोहोचताच त्याला ते दंडासह तिकिटांचे पैसे पोस्टमनकडे देऊन, सोडवून ताब्यात घ्यावे लागते.
‘या वजनदार पार्सलात आहे तरी काय ?’ हे पाहण्याच्या उत्कंठेने त्याने ते फ़ोडले, तेव्हा त्याला त्यात एक मध्यम आकाराचा दगड व त्यावर चिकटवलेली एक चिठ्ठी आढळली.

चिठ्ठीत लिहिलं होतं, ‘तिकिटे न लावलेल्या लिफ़ाफ़्यातील तुमचे पत्र मिळाले पत्रातून तुम्ही कळविलेल्या तुमच्या खुशालीमुळे माझ्या उरावर असलेला काळजीचा एवढा मोठा दगड दूर झाला.’हा धडा मिळाल्यावर पुन्हा तो खवचट माणूस तशा तऱ्हेचा व्याप करण्याच्या फ़ंदात पडला नाही.