Tag Archives: चिन

दगडोबावर दावा

चीन देशात पुर्वी चॅंग या नावाचा एक चतूर व नि:पक्षपाती न्यायाधीश होऊन गेला. एकदा डोलीत बसून तो रस्त्याने जात असता, रस्त्याच्य कडेला एका दहा-बारा वर्षांचा मुलगा हमसाहमशी रडत बसलेल त्याने पाहिला.

चॅंग यांने भोयांना डोली थांबवायला सांगून, त्या मुलाला रडण्याचे कारण विचारले. यावर तो मुलगा म्हणाला, ‘परिस्थितीने अतिशय गरीब आहे. रस्त्याच्या बाजूला बसून मी भजी विकतो व थोडीफ़ार कमाई करुन, मी माझ्या वडिलांना मदत करतो, पण आज तेलान थबथबलेली ताजी भजी पूर्णपणे विकली जाताच, आलेले पैसे या दगडावर ठेवून मी थोडा आडवा झालो असता, पाच-दहा मिनिटं डुलकी लागली. तेवढ्यात कुणीतरी माझे पैसे चोरले. आता जर मी पैशांशिवाय घरी गेलो, तर परिस्थितीने गांजलेले माझे वडिल मला वाटेल तसा दम देतील -नव्हे एखादे वेळी मारही देतील.’

‘तुला संशय येतो का कुणाचा?’ असं चॅंगनी विचारताच तो मुलगा म्हणाला, ‘कुणाचा संशय घेऊ? या गावातले साधारण सर्व लोक मला ओळखत असताना, मज गरिबांचा कुणी पैसे चोरण्याचा नीचपणा करील, ही कल्पनाच माझ्या मनाला शिवत नाही.’

न्यायमुर्ती चॅंग म्हणाले, ‘तर मग ज्या दगडावर तू पैसे ठेवले होतेस, त्या दगडानेच तुझे पैसे चोरले असावेत.’ याप्रमाणे बोलून त्या दगडाची न्यायालयीन चौकशी करण्याठी न्यायमुर्तेअ चॅंग यांनी एका शिपायाला बोलावून, त्या दगडाला उचलून न्यायालयात हजर करायला सांगितले व ते प्रकरण त्याच दिवशी सुनावणीसाठी आपल्यापुढे आणले.

न्यायमुर्तेअ चॅंग यांनी रस्त्यावरच्या एका निर्जीव दगडाला चोर ठरवून, त्याची आज न्यायालयीन चौकशी करण्याचे ठरविल्याची बातमी गावात तासाभरात पसरताच, लोक आपापसात कुजबुजू लागले, ‘अरेरे ! एवढा चतुर व नि:पक्षपाती न्यायाधीश, पण देवानं एकाएकी त्याचं डोकं असं फ़िरवून टाकलं ! पण ते काही का असेना… या मजेदार दाव्याचं कामकाज पहायला न्यायालयात जायला काय हरकत आहे?’ याप्रमाणे बोलून प्रत्येक गावकरी दगडोबावरच्या दाव्याचं कामकाज पाहायला न्यायालयात गेला. त्यामुळे न्यायालय खच्चून भरुन गेलं.

ठरलेल्या वेळी न्यायमुर्ती चॅंग आपल्या आसनावर य़ेऊन बसले. त्यांच्यासमोर त्या आरोपी दगडोबाला ठेवण्यात आलं, तर थोड्या अंतरावर त्या मुलाला बसायला सांगण्यात आलं. एवढं झाल्यावर न्यायमुर्तींनी त्या दगडाला विचारलं, ‘खरं बोल; तू या मुलाचे पैसे चोरलेस की नाही ?’

हा प्रश्न त्या दगडाला तीनदा विचारूनही तो काही एक उत्तर देत नाहीसे पाहून न्यायमूर्ती चॅंग म्हणाले, ‘ज्या अर्थी हा आरोपी दगड, त्याला तीनदा विचारुनही काहीएक उत्तर देत नाही, त्या अर्थी यानेच या गरिब मुलाच्या पैशांची चोरी केली असली पाहिजे.’ असं म्हणून न्यायमुर्तींनी एका शिपायाला त्या दगडालाच शंभर फ़टके देण्याची शिक्षा फ़र्माविली.

शिपाई त्या दगडाला फ़टक्यांमागून फ़टके देऊ लागताच, तिथे जमलेले लोक खो खो हसू लागले. ते पाहून न्यायमुर्ती चॅंग रागावून म्हणाले, ‘मी दिलेल्या निर्णयाला हसून इथे जमलेल्या सर्व लोकांनी न्यायालयाचा अपमान केलेला आहे. म्हणून मी या लोकांपैकी प्रत्येकाला २५ पैशांच्या दंडाची किंवा एक दिवसाच्या कारावासाची शिक्षा फ़र्मावितो.’

लोकांनी एका दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यापेक्षा २५ पैसे दंड भरुन मोकळं होण्याचं ठरविल्यामुळं, न्यायालयातील कारकुनानं तिथे जमलेल्या सर्व स्त्री-पुरुषांची नावं लिहून घेतली आणि मग त्यांना दंडाची रक्कम आणण्याकरीता घरी जाऊ दिले.

दरम्याने इकडे न्यायमुर्तींनी सेवकाकरवी उकळत्या पाण्यानं भरलेलं एक पातेलं मागवून घेतलं आणि ते आपल्या पुढ्यात ठेवून दिलं. एकेक स्त्री वा पुरुष आपापल्या दंडाचे पैसे घेऊन न्यायमुर्तींसमोर येऊ लागला व त्यांच्या सुचनेनुसार ते पैसे त्या पातेल्यात टाकू लागला. तिने वा त्याने त्या पातेल्यात पैसे टाकले रे टाकले की न्यायमुर्ती चॅंग त्या पाण्याकडे एकदा निरखून पाहत आणि त्यांना त्या पाण्यात हवे ते आढळले नाही, की दुसऱ्या स्त्रीला किंवा पुरुषाला त्या पातेल्यात पैसे टाकण्यासाठी बोलावीत.

असं होता होता पाच-पंचवीस जणांनी त्या पाण्यत आपापल्या दंडाची रक्कम टाकली, आणि न्यायमुर्तींनी त्यांना जायची परवानगी दिली, पण एका मनुष्यानं त्या पाण्यात दंडाची रक्कम टाकताच न्यायमुर्तींनी त्या पाण्याकडं पाहिलं आणि ते पैसे टाकणाऱ्या इसमाला शिपायाला पकडायला सांगितला.

शिपायानं त्याप्रमाणे त्याला पकडताच न्यायमुर्ती चॅंगनी त्याला दरडावून विचारलं, ‘खरं बोल; तू चोरलेस की नाही, या गरीब मुलाचे पैसे ? तू जर बऱ्या बोलानं अपराध कबूल केला नाहीस, तर तू खरं सांगेपर्यंत तुला फ़टके देण्याचा मी शिपायाला हुकूम सोडीन.’ त्या माणसानं गुन्हा कबूल केला. गावकरी थक्क झाले. त्यांनी चॅंगना विचारलं,
‘न्यायमुर्ती ! हाच मनुष्य अपराधी असल्याचं तुम्ही कसं ओळखलं ?’

न्यायमुर्ती चॅंग म्हणाले, ‘हा मुलगा जी भजी विकत होता, ती ताजी असल्यामुळं तेलानं थबथबलेली होती. तो ज्या हातानं ती भजी गिऱ्हाइकांना देत होता, त्याच तेलकट हातानं त्या भज्यांचे पैसे घेऊन त्या दगडावर ठेवीत होता. त्यामुळं ते पैसेही तेलकट असणार, हे मी हेरले. मग दगडालाच गुन्हेगार ठरवून त्याची न्यायालयीन चौकशी सुरु केली की, गावातले झाडून सारे स्त्री-पुरुष ते अजब कामकाज पाहायला येणार व त्या दगडाल फ़टक्यांची शिक्षा दिल्यावर हसणार हेही मी जाणून होतो. त्यानंतर हसण्याबद्दल लोकांना प्रत्येकी २५ पैसे दंड ठेवला की खरा चोर चोरीच्या पैशातलेच पैसे दंडाची रक्कम म्हणून भरणार, हेही उघड होते. माझ्या अंदाजाप्रमाणेच सर्व झाले. लोक दंडाची रक्कम आणून देण्यापूर्वीच मी हे उकळत्या पाण्यानं भरलेलं पातेलं इथं मागवून घेतलं व प्रत्येकाला दंडाची रक्कम या पातेल्यात टाकायला सांगितली. खऱ्या गुन्हेगारानं दंडाची रक्कम भरण्यासाठी चोरलेल्या पैशातलेच २५ तेलकट पैसे आणले व ते या पाण्यात टाकले. त्याबरोबर या पाण्यावर तेलाचा तवंग तरंगू लागला व चोर बरोबर सापडला.’

याप्रमाणे खुलासा करुन न्यायमुर्ती चॅंग यांनी गुन्हेगाराला चोरलेल्या पैशांच्य पाचपट रक्कम त्या गरीब मुलाला द्यायला शिक्षा फ़र्मावली व इतरांची दंडाची रक्कम त्यांना कारकुनाकरवी परत केली. न्यायमुर्ती चॅंग यांच्या चातुर्याने सगळे गाव थक्क झाले.