Tag Archives: छत्री

मी नोकर खाविंदचा

एकदा अकबर बादशहा हातामध्ये असलेलं वांग बिरबलाला दाखवीत म्हणाला, ‘बिरबल, वांग हे फ़ळ अतिशय घाणेरडं दिसत नाही रे ? जणू भिकाऱ्याची झोळीच. हे देठ म्हणजे जणू खांद्यात अडकावयाचा बंद आणि हा खालचा भाग म्हणजे आतील भिक्षेच्या वजनानं खाली लोंबणारा झोळीचा घोळ. दिसतं की नाही खराब ?’

यावर बिरबल म्हणाला, ‘हुजूर, किती हुबेहूब वर्णत केलत आपण वांग्याचं. म्हणून तर, याला हातातसुध्दा घेऊ नये, असं मलाही वाटतं.’सात-आठ दिवसांनी पुन्ह तशाच आकाराचं एक वांग हाती घेऊन बादशहा बिरबलाला मुद्दाम म्हणाला, ‘ बिरबल, वांग हे भलतचं सुंदर फ़ळ आहे, नाही रे ? देठ वर धरुन वांग खाली केलं की, जणू अंबारीखाली किंवा छत्रीखाली एखादा गुबगुबीत राजाच बसला असल्याचा भास होतो, तुला काय वाटंत ?’

बिरबल बेछूटपणे म्हणाला, ‘खाविंद, अगदी माझ्या मनातलंच आपण बोललात. वांग्यासारखं देखणं आणि राजेशाही थाटाच फ़ळ दुसरं कुठलं असेल, असं मला तरी वाटत नाही.’

यावर बादशहा रागावून म्हणाला, ‘बिरबल, तुला स्वत:चं असं मत आहे की नाही? अरे, त्या दिवशी मी वांग्याला, ते भिकाऱ्याच्या झोळीसारखं भिकार दिसत असल्याचं म्हणताच, तूही त्याची निंदानालस्ती केलीस, आणि आज मी त्याला छत्राखाली बसलेल्या बाळसेदार राजाची उपमा देताच, तुही त्याची हिरिरीनं नावाजणी करायला लागलास ?’

बिरबल म्हणाला, ‘खाविंद, मी आपला नोकर आहे; वांग्याचा नाही. त्यामुळे मी जे बोलेन ते त्या वांग्याला बरे वाटेल की वाईट वाटेल, या गोष्टीचा विचार करण्याची मला गरज नाही. ही सुखाची नोकरी टिकवण्यासाठी कुणीकडून आपली मर्जी राखली गेली की झाले.’ बिरबलाच्या या अनपेक्षित पण मजेदार उत्तरामुळे, बादशहा अगदी पोट धरधरुन हसू लागला.