Tag Archives: जर्दाळू

जर्दाळूचा साखरभात

साहित्य :

  • ३ वाट्या बासमती तांदूळ
  • ३ वाट्या साखर
  • २५० ग्रॅम जर्दाळू
  • ४-५ लवंगा
  • २-३ दालचिनीचे तुकडे
  • ७-८ वेलदोड्याची पूड
  • पाव चमचा केवडा इसेन्स (रोझ इसेन्स चालेल)
  • थोडी केशरची पूड
  • पाव चमचा मीठ
  • तूप

कृती :

जर्दाळू स्वच्छ धुवून ३ ते ४ तास गरम पाण्यात भिजत घालावे. नंतर त्यातील बिया काढाव्या.
तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीवर निथळत ठेवावे. नंतर पातेल्यात थोडे तूप घालून लवंग-दालचिनीची फोडणी करावी. त्यावर तांदूळ घालून जरा परतावे. नंतर तांदुळाच्या दुप्पट पाणी घालून नेहमीप्रमाणे भात करून घ्यावा. ह्यातच मीठ घालावे. भात शिजला व भाताची वाफ जिरली की भात परातीत उपसून टाकावा. जेवायच्या कांट्याने सारखा करावा व गार होऊ द्यावा.

साखरेत अर्धी वाटी पाणी घालावे. जर्दाळू ज्या पाण्यात भिजत घातले ते पाणी घालावे व एका पाक करावा. थोडा पाक ताटात टाकून पहावा. लगेच गोळी वळली गेली तर त्याला पक्का पाक म्हणतात. पाकात भिजवलेले जर्दाळूचे मोठे तुकडे, वेलदोड्याची पूड व भात घालून ढवळावे. भात घातल्यावर मिश्रण जरा पातळ होईल. पण पुनः घट्ट होईल. जर्दाळूतील बदाम-बीचे २।२ तुकडे करून ठेवावे. तेही ह्या भातात घालावे. केशर व केवढ्याचा इसेन्स घालावा. बाजूने थोडे साजूक तूप सोडावे. भात घट्ट झाला की उतरवावा. भात गार झाला की हाताने मोकळा करावा व शोभिवंत भांड्यात काढावा.