Tag Archives: जवाहिर

खरा हिरा

एकदा एका जवाहिर पुण्यास पेशव्यांच्या दरबारात गेला. तिथे त्याने हुबेहुब एकमेकांसारखे दिसणारे दोन पैलूदार दिसणारे दोन पैलूदार ‘खडे’ एका मेजावरील बशीत थोडेसे अंतर मध्ये ठेवून ठेवले आणि यातला खरा हिरा कोणता व खडीसारखरेचा खडा कोणता ? हे लांबून ऒळखायला सांगितले.

पेशव्यांच्या दरबारी तसे रत्नपारखे बरेच होते, परंतू, खड्यांना हात न लावता, त्यांच्यातला खरा हिरा कोणता, हे कुणाला ओळखता येईना. अखेर सर्वांच्या नजरा नाना फडणीसांकडे वळल्या. नानानीं त्या जवाहिऱ्याला प्रश्न विचारून, बोलण्यात गुंतवून ठेवलं, तू हे हिरे कुठुन आणतोस ? प्रतिवर्षी तुला धंद्यात एकून कीती फ़ायदा होतो ? हिऱ्यांना तू स्वत: पैलू पाडतोस की, आयत्या पैलू पाडलेल्या स्थितीतच तू ते दुसऱ्यांकडून खरेदी करतोस ? अशा अनेकानेक प्रश्नांची सरबत्ती नांनानी त्या जवाहिऱ्यावर सुरु केली. परंतू त्याच्याशी बोलत असताना त्यांनी आपली नजर मात्रा त्या दोन हिऱ्यांवरुन जराही ढळू दिली नाही.

अशा तऱ्हेने त्या जवाहिऱ्याशी बोलणे चालू असता, नानांनी त्या दोन हिऱ्यांपैकी एका हिऱ्यावर माशी येऊन बसलेली पाहिली. त्या बरोबर ते त्या जावाहिऱ्याला म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी, आम्हाला आमच्या मेंदूला शीण द्यावा लागला नाही, ते उत्तर श्रीमंताच्या दरबारात बावरणाऱ्या एका माशीनच देऊन टाकलं आहे. ती पहा, त्या दोन खड्यांपैकी एका खड्यावर बसलेली माशी. ती ज्या खड्यावर बसली आहे ना तो खडीसाखरेचा खडा, आणि तो उरलेला खरा हिरा.

स्वत: रत्नपारखी नसताना, रत्नपारख्यांना जे जमले नाही, ते नानांनी करुन दाखविताच तो जवाहिर थक्क झाला.