Tag Archives: जीवनविद्या मिशन

जीवनविद्या मिशनचे सदगुरू वामनराव पै काळाच्या पडद्याआड

Wamanrao Pai

‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा आयुष्य बदलून टाकणारा ‘गुरुमंत्र’ देऊन अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारे सदगुरू वामनराव पै (वय ९०) यांचे दीर्घ आजारामुळे आज मुंबईत निधन झाले. ते ‘जीवनविद्या मिशन’ चे संस्थापक होते. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजपरिवर्तनाला एक वेगळी दिशा दिली होती. उद्या सकाळी दहा वाजता बोरिवली येथे त्यांच्या निवासस्थानाजवळून अंतयात्रा निघणार असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

एका मध्यमवर्गीय कुटुंबात वामनराव पै यांचा जन्म झाला होता व ते मुंबई विद्यापीठाचे पदवीधर होते. त्यांनी अधिकारी म्हणून राज्य सरकारच्या सेवेत उत्तम कामगिरी केली आहे. त्यांना पूर्वीपासूनच अध्यात्म व समाजकार्याची आवड होती आणि म्हणूनच निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला पूर्णपणे ह्या कार्याला वाहून घेतले. वयाच्या २५ साव्या वर्षी पै यांना त्याच्या गुरुंनी म्हणजे नाना महाराज शिरगावकर यांनी त्यांना अध्यात्माची प्रेरणा दिली. त्यांनी अध्यात्मसाधनेत प्रगती केली आणि त्यानंतर १९५२ पासून त्यानी अध्यात्मावर प्रवचने द्यायला सुरुवात केली. त्यांची शिकवण अत्यंत साधी व सोपी असल्यामुळे त्यांचे अनुयायी हळूहळू वाढत गेले. त्यातूनच ‘नादसंप्रदाय ट्रस्ट’ उभारला गेला. १९५५ मध्ये दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर ह्या मंडळाच्या कार्याला सुरुवात झाली आणि ‘जीवनविद्या मिशन’ ने त्यातूनच आकार घेतला. ‘जीवनविद्या मिशन’ चे समाजशिक्षणाचे कार्य गेली अनेक वर्षे त्यांच्या प्रेरणेतून अविरत सुरु आहे. जीवनविद्येची शिकवण देणारी २५ हून अधिक पुस्तके वामनराव पै यांनी सोप्या भाषेत लिहिली. जगभर प्रवास करुन त्यांनी याच विषयावर व्याख्यानेही दिली. मुंबई जवळ कर्जत येथे ‘जीवनविद्या ज्ञानपीठ’ ही संस्था त्यांच्या प्रेरणेतूनच स्थापन करण्यात आली आहे व त्याचे उद्घाटन एप्रिल महिन्यात झाले. जीवनविद्येची खास शिकवण देण्याबरोबरच मनःशांती लाभावी, असे सुंदर वातावरण देखिल तेथे तयार करण्यात आले आहे.