Tag Archives: डिग्री

डिग्री नको डिप्लोमाच

डिप्लोमा

डिप्लोमा

इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी दहावी नंतर थेट डिप्लोमाकडे जाण्याचा कल सध्या पुणे विभागातील विद्यार्थ्यांचा दिसून येत आहे. पुढील वर्षापासून इंजिनीअरिंगच्या पदवी प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरील पदवी परीक्षा घेण्याचा निर्णय मध्यंतरी घेण्यात आला होता. ही परीक्षा हेच या ‘ट्रेंड’ मागचे प्रमुख कारण असल्याचे निरीक्षणास येते.

इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीचे मार्कही गृहीत धरले जाणार आहेत. अजून तरी स्पष्ट झालेले नाही की प्रवेश परीक्षेला आणि बारावीच्या मार्कांना नेमके किती महत्त्व असेल. तरी असे बोलले जात आहे की ही प्रवेश परीक्षा राज्याच्या सीईटीपेक्षा कठीणच असेल. त्यामुळे बरेच विद्यार्थी ज्यांना दहावीत चांगले गुण मिळाले आहेत ते अकरावी सायन्स घेण्यापेक्षा थेट डिप्लोमा करण्यास उत्सुक आहेत.

पुणे विभागाचे तंत्रशिक्षण सहसंचालक डी. एन. शिंगाडे यांनी माहिती दिली की, ‘मागील वर्षापेक्षा डिग्रीसाठीचे अर्ज यावर्षी निश्चितच कमी आहेत.’

‘सीईटी न देता डिप्लोमा मध्ये इंजिनीअरिंगच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो. गेल्या वर्षी थेट दुसऱ्या वर्षासाठी उपलब्ध असलेल्या जागांच्या संख्येत दहा टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांचा कल डिप्लोमाकडे असल्याचे दिसून येते,’ असे ते म्हणाले.

आयआटी प्रतिष्ठानचे संचालक संजय कुलकर्णी यांनी नमूद केले की, ‘अनेक विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी पुढील वर्षापासून होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेचा धसका घेतला आहे. अनेक विद्यार्थी आमच्याकडे अकरावीच्या कौन्सेलिंगसाठी येत असतात. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमच्या हे निरीक्षणास आले. त्यामुळे दहावीत चांगले मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही अकरावी सायन्सपेक्षा डिप्लोमाचाच पर्याय अधिक चांगला वाटू लागला आहे.’