Tag Archives: डॉ. उदय के. नेरलकर

वाढती सांधेदुखी व पथ्य

संधीवाताच्या रोगावर पथ्यापथ्य, चिकित्सेने होणार परिणाम हा रोग्यांची सांधेदुखी कमी होण्यास अधिकच मदत होईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत.काही सांधेदुखीचे रोगी  हेज्यांनी आहारात अवेळी जेवण करणे. अल्प जेवण करणे, शिळे, रूक्ष अन्न खाणे, अवेली भोजनात जड अन्न खाणे, अत्याधिक मैथुन करणे तसेच आहारात तेल, तुपाचे प्रमान कमी असणे, विशेषतः गरीब वर्गात तेल, तुप इत्यादी प्रमाण कमी असून अत्याधिक कष्टाची, मेहनतीची कामे करावी लागतात. तसेच वाढते वय, त्यामुळे शरीरात होणारी धातूंची झीज, बलहानी, पोषणाचा, पोषकतत्त्वाचा अभाव हा गरीब वर्गात आढळतो. तसेच काही लोकांचे अत्याधिक फिरणे, धार्मिक भावात अतिउपवास करणे, मानसिक चिंता, शोक तसेच एखाद्या आजाराच्या परिणामी येणारी दुर्बलता इत्यादी कारणांमुळे सांधेदुखीही आढळते. अशा रोग्यास त्याचे पथ्य म्हणजे आहार आणि विहारातील बदल हाच होय. जसे त्यांच्या आहारात तेल, तूप इत्यादी स्निग्ध पदार्थ घेणे, धातूंना पोषक व बृहन करणारा असा मांसरस, दूध, तूप, तेल इत्यादी आहारात घेणे. तसेच विहारात कष्टाची कामे कमी करणे, योग्य असा आराम घेऊन ती करणे. इत्यादीमुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होईल. सध्या मध्यम व उच्च वर्गातील रूग्णांमध्ये वाढती सांधेदुखी घेऊन येणारे रूग्ण अतिप्रमाणात येत आहेत.

त्यावरून त्यांचे निदान आम्ही करत असतांना ते बहुधा संधिवाताच्या आमवात, वातरक्त इत्यादी गंभीर प्रकारातील आढळतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्य जनतेत कामाच्या व्यापाने व इतर कारणाने अवेळी भोजन, विरूद्ध आहार, भूक लागली नसतांना पण जेवणे. तेल तुपाचे पदार्थ, अति स्निग्ध, जड असे भोजन करणे व लगेचच फिरणे, तसेच सदा काही ना काही खात राहाणे. नुसते पडून वा बसून राहणे. थंड कुलरसमोर वा वातानुकुलीन रूममध्ये जास्त काळ राहणे. रोज दिवसा झोपणे, लठ्ठ होण्याच्या इच्छेपोटी अति स्निग्ध पदार्थ जसे तूप, बदाम, काजू, शेंगदाणे, दूध व त्याची विकृती, बासुंदी, दही, श्रीखंड आदी खाणे. आईसक्रीम खाणे, फ्रीजचे अतिथंड पाणी सतत पिणे, रात्री कामास कंटाळून रोज भात, खिचडी खाणे अशा आहार व विहाराने दुषित अशा (विकृत आहार रस भाव) आमाची, धातूची मेदाची वृद्धी होते. त्यामुळे परिणामी लठ्ठपणा (मेदवृद्धी), आमवात (सांधेदुखी)आदि आजारांचे पाहुणे शरीरात येतात. तेव्हा अशा सांधेदुखीच्या रूगणांना त्यांचे पथ्य म्हणजे त्यांनी भूक लागल्याशिवाय जेवू नये. आहारात स्निग्ध पदार्थ, तांदळासारखे पदार्थ, दूध व त्यांची विकृती, तसेच जड अन्न इ. खाणे टाळावे. तसेच फ्रीजचे अतिथंड पाणी पिणे, थंड पेय इ. टाळावे. कोष्ण पाणी पिणे, दिवसा शरीरास शक्यतोवर सतत व्यायामात राहील असे शरीर हालचालीत ठेवणे. यातच प्रात फिरणे, घरची कामे करणे इ. पथ्यांनी वरील रोग्यास बराच फायदा होईल. तसेच सांधेदुखीत सांधे हालचालीत राहिल्याने पुढील उपद्रव होणे टळतील.

सांधेदुखीचे पथ्यापथ्य सांगताना सध्याच्या बदलत्या हवामानाचा (कालाचा) विचार पण एक प्रमुख मार्गदर्शक ठरतो. तेव्हा उन्हाळ्यात उन न पडणे, पाऊस पडणे तसेच हिवाळ्यात पाऊस पडणे वा पावसाळ्यात उन पडणे या बदलत्या वातावरणाचा शरीरावर तसेच सांधेदुखीवर प्रभाव हा पडतो. पण कालाचा परिणम टाळाणे हे अपरिहार्य आहे. त्यावर तोडगा म्हणजे आयुर्वेदातील व्यापक असा पंचकर्म उपचार, स्वस्थ वृत्त, व ऋतकालीन दिनचर्या इ. होय. तसेच काही रूग्णांत आढळणारे सांधेदुखीचे आगळे वेगळे स्वरूप म्हणजे सांध्यात ठणका असणे, दिवसा व रात्री झोप न लागणे, छोटे सांधे दुखणे, अतिशय वेदना, स्पर्श सहत्व, सार्वदेहीक दाह, दांर्बल्य पांडुता असणे, भूक न लागणे इत्यादी लक्षणे, जी श्रीमंत व सामान्य वर्गात पण आढळतात, त्यांची कारणमीमांसा लावली असता ती म्हणजे दूषित रक्ताची (वात रक्तांची) सांधेदुखी लक्षणे होत.

अशा रोग्यात त्यांचा आहार विहार, आमवातातील रोग्याच्या साजेचा पण रक्ताला विदग्ध करणारा असा घडलेला असतो. असे रूग्णात मंदाग्नी असतांना जेवणे, अजीर्ण झाले तरी खाणे तसेच सांध्याची आंबलेली खारट, आंबट, गोड असे पदार्थ खाणे, त्यातच चाट भांडावरील पदार्थ अधिक सातत्याने खाणे, दही सतत खाणे, थंड पेये, फळांचा रस थंड असा पिणे, मांसाहार इ. खाणे, अति चहा पिणे, अति मद्यपान करणे, धुम्रपान करणे, रात्री जागरण करणे, अति फिरणे, तसेच उष्ण शीतकाल व्यतासात येणे इ. आहार व विहार वात व रक्त अशा दोन्ही गोष्टीस प्रकुपित व दुषित करतो. असे दुष्ट रक्त व वात संधिस्थानात , शोच, ठणका आदी पूर्वरूपात्मक लक्षणे उत्पन्न करतात. अशा रोग्यात त्यांनी आपला आहार विहार बदलला पाहिजे. व प्रामुख्याने वरील सातत्याने घडणाऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांच्या सांधेदुखीचे निराकरण व उपचार हा पथ्याने साधता येईल. अशा प्रकारे सांधेदुखीच्या आजारावर व इतर अनेक आजारांवर आपल्याच आहार विहारातून प्रारंभी पथ्यापथ्यानेव आयुर्वेदातील इतर व्यापक उपचाराने विजय मिळविणे सहज शक्य होईल.