Tag Archives: डॉ. सौ. मालती सोलापूरकर

गर्भपात

अ‍ॅबॉरशन(Abortion) केव्हा करावे? केव्हां करू नये ?

गर्भपात होणे आणि गर्भपात करणे या दोन्ही घटना तशा शारीरिक, मानसिक हानी करणाऱ्या असतात. गर्भपाताविषयी उहापोह करणारा हा लेख….

नैसर्गिक गर्भपात ही कोणत्याही स्त्रीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जबर धक्का देणारी गोष्ट आहे. मुख्यस्वप्ने पाहणारी आनंदी स्त्री त्यामुळे अचानक निराशेच्या आणी दुःखाच्या गर्तेत लोटली जाते. नैसरिगिक गर्भपातामुळे होणारी जीवितहानी आणि स्त्रियांना येणारी शारीरिक दुर्बलता ह्यांचे प्रमाण काळजी करण्यासारखे आहे. भारतात शेकडा १२ ते १५ टक्के गरोदर स्त्रियांमध्ये गर्भपात होतात.
सात महिने किंवा २८ आठवड्यांच्या आत गर्भधारणेची समाप्ती झाली तर त्याला गर्भपात असे म्हणतात. अशा कालावधीत जन्मलेले अर्भक स्वतंत्रपणे जगण्यास असमर्थ असते. कारण जीवनाला आवश्यक असणाऱ्या श्वसन, रक्ताभिसरण, अन्नाचे सेवन आणि पचन इत्यादी शारीरिक क्रिया योग्य प्रकारे होऊ शकत नाहीत. अशा अर्भकाचे वजन १ किलो म्हणजे एक हजार ग्रॅंम्स किंवा थोडे अधिक एवढेच असते. पुर्ण वाढ झालेल्या व पूर्ण दिवसांनी जन्मलेल्या अर्भकांचे वजन २५०० ग्रॅम्स किंवा त्याहून अधिक असते.

गर्भपात कशामुळे होतो ?
इतर प्रगत देशांच्या मानाने भारतात नैसर्गिक गर्भपाताचे प्रमाण जास्तच आहे. सुस्थितीत असलेला वरच्या समाजातील स्त्रियांपेक्षा समाजातील खालच्या थरातील स्त्रियांमध्ये हे प्रमाण अधिक असते. शरीराचे अपुरे पोषण, आहारात योग्य अन्नघटकांचा अभाव, खूप शारीरिक कष्ट, मानसिक ताण, दारू पिणे, विड्या ओढणे, तंबाखू चघळणे इत्यादी व्यसने ह्यांमुळे ह्या वर्गात गर्भपात अपुऱ्या दिवसांची प्रसूती ह्याचे प्रमाण फार आढळते. शिवाय वारंवार होणाऱ्या गर्भधारणेमुळे शरीराचे झालेली झीज भरून येण्यास अवधीच मिळत नाही आणि अशक्तपणामुळे गर्भपाताची प्रवृत्ती वाढीस लागते.तथापि समाजाच्या वरच्या थरातील स्त्रियांमधेही कमी प्रमाणात का होईना पण गर्भपात होतातच. त्याची कारणे अर्थातच निराळी असू शकतात.

गर्भपाताच्या कारणांची मीमांसा ढोबळपणे अशी करता येईल.
(अ) स्त्री-बीज आणि शुक्रजंतू ह्यांच्या संयोगाने तयार होणाऱ्या गर्भपेशीतच काहीतरी दोष असता किंवा उत्पन्न होतो व गर्भाची वाढ योग्यप्रकारे न होता तो नाश पावतो. असा मृत गर्भ नंतर शरीरातून बाहेर ढकलेला जातो. स्त्री-बीज किंवा पुरुष बीज ह्यांमध्ये काही अनुवांशिक दोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(ब) एखाद्या स्त्रीला रक्तदाब, मधूमेह किंवा मूत्रपिंडाचा विकार असतो गर्भावस्थेत इंद्रियावर ताण पडल्याने असे विकार बळावतात व वाढणाऱ्या गर्भावर अनिष्ट परिणाम होऊन त्याचा नाश होतो आणि गर्भपात होती. सिफीलीस किंवा गरमीचा विकार जडल्यास किंवा टायफॉईड, न्यूमोनियासारख्या जंतुदोषामुळे होणाऱ्या आजारात खूप ताप आल्यास गर्भावर दुष्पपरिणाम होतो. शरीर खूप माजणे, खूप मार लागणे, पडणे, जुलाब वांत्या होणे अशासारख्या कारणांनी एकाएकी प्रकृती ढासळली, तरीसुद्धा गर्भावर परिणाम होऊन त्याचा नाश होऊ शकतो. गरोदरपणांत स्त्रीला आत्यंतिक मानसिक ताण सहन करावा लागला, तरीही गर्भपात होण्याची शक्यता खूपच वाढते. कदाचित बऱ्याचशा गर्भपातांचे हे एक प्रमुख कारण असू शकेल.गरोदरपणात गर्भपात घडवून आणण्यासाठी केलेले वेडेवाकडे प्रयत्न, खूप शारीरिक श्रम, वारंवार घडलेले शरीरसंबंध ह्यामुळेही गर्भपात होऊ शकतात.

(क) काही स्त्रियांना वारंवार गर्भपात होण्याची कोड जडलेली दिसते. अशा स्त्रियांमध्ये गर्भाशयात उपजतच काहीतरी दोष असतो. खूप दिवस वंध्यत्व आणि नंतर वारंवार गर्भपात अशी लक्षणे दिसून येतात. गर्भाशय पालथा असल्यास ( रिट्रोव्हटेंड युटेरस ) १० ते १२ आठवड्यांचे दरम्यान गर्भपात होऊ शकतात.गर्भाशयावर गाठ असेल किंवा गर्भाशयाची योग्यप्रकारे वाढ (गर्भारपणी पाण्याच्या बादल्या, मोठी पातेली, पाटा इत्यादी जड वस्तू उचलणं अत्यंत धोक्याचं असतं. ) ( दिवस गेल्यावर नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेणे हे गर्भवतीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. ) झालेली नसेल तरीही गर्भपात होतो.काही वेळा गर्भाशयाच्या ग्रीवामुखाभोवतालचे स्नायू दुर्लब असतात किंवा होतात आणि त्यामुळे अशा स्त्रीला वारंवार गर्भपात होतो. असा गर्भपात साधारण ३ महिन्यानंतर होतो. आधुनिक तपासणीच्या तंत्रांनी ( एक्सरे लॅपरोस्कोपी ) अशा विकृती शोधून त्यावर उपाय योजना करता येते.

(ड) पती आणि पत्नी ह्यांचे रक्तगट विभिन्न असले, विशेषतः स्त्रीचा रक्तगट आर. एच. नेगेटिव्ह (Rh-ve) व पतीचा आर. एच पॉझिटिव्ह (Rh+ve) असेल तर गर्भपात, अपुऱ्या दिवसांची प्रसूती किंवा जन्मणाऱ्या मुलाला कावीळ रक्तदोष होण्याचे शक्यता असते. उपवर मुलींचे रक्तगट तपासून घेऊन Rh-ve असलेल्या मुलींचे बाबतीत जोडीदाराचा रक्तगट तपासून घेतला तर वरील दोष सहज टाळता येतील.

गर्भपात आणि काळजी
गर्भपातामुळे होणारी हानी कमी करावयाची असेल तर पहिल्या गरोदरपणात अगदी सुरुवातीपासूनच वैद्यकीय तपासणी करून घेतली पाहिजे.शरीरात असणारे पुष्कळसे रोग किंवा दोष सूप्तावस्थेत असतात. गरोदरपणामुळे शरीरावर जास्त बोजा पडला की असे विकार बळावतात. आणि त्याचे दुष्परिणाम होऊन गर्भपात किंवा इतर गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात.

पोटात दुखणे, रक्तस्त्राव होणे अशी गर्भपात होण्याची लक्षणे दिसू लागल्यानंतर डॉक्टरकडे घाव घेतलीतर दोष शोधून त्यावर उपचार करण्याइतका अवधीच नसतो. गर्भपाताबरोबर होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे किंवा जंतुदोषांमुळे गरोदर स्त्रीच्या जीवाला निश्चितपणे धोका असतो म्हणून पोटात दुखणे किंवा जाणे अशी लक्षणे अगदी अल्प प्रमाणात अस्ली तरी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेऊन इलाज करावा. घरगुती उपायांवर अवलंबून राहूनये. गर्भपातानंतर धनुर्वात होण्याचासुद्धा संभव असतो. आकस्मिक गर्भपात होणे हे तसे अनैसर्गिकच आहे. तेव्हा त्याचे कारण शोधून त्यावर योग्य इलाज करणे अत्यंत आवश्यक आहे. व तसे करण्याची तज्ज्ञांवर जबाबदारी आहे.

कृत्रिम गर्भपात
कुटुंबात मुलांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी व दोन मुलांच्या मध्ये वयाचे योग्य अंतर राहावे म्हणून अनेक स्त्री पुरुष आज कुटुंब नियोजन साधनांच वापर करतात. असे उपाय असफल झाले तर होणारे मूल नको म्हणून अनेक स्त्रिया दाई, वैदूलोक ह्यांचे सल्ल्याने गोळ्या औषधे झाडपाल्यांचा रस किंवा इतर कोणत्याही अघोरी मार्गाने गर्भपात करण्याचा प्रयत्न करताना अशा उपयांनी अनेक मुलींनी व स्त्रियांनी आपला जीव गमावला आहे किंवा त्या कायमच्या दुखणाईत झाल्या आहेत.

गर्भपाताचा कायदा
अवांच्छित गर्भधारणा झाली तर त्याची आज कायद्याने समाती करता येते. ह्या संबंधीचा कायदा मेडिकल ऑफ प्रेग्नसी अ‍ॅक्ट भारतात १९७१ साली संमत झाला. ह्या कायद्यानुसार वीस आठवडे किंवा पाच महिन्यापर्यंत गर्भपात करता येतो.
काही निवडक परिस्थितीतच असा गर्भपात कायदेशीर असतो. ती कारणे म्हणजे
(अ) गरोदरपणामुळे व पुढे होणाऱ्या प्रसुतीमुळे त्या स्त्रीच्या जिवास निश्चित धोका आहे असे वाटले तर गर्भपात करता येतो.
(ब) गरोदरपणामुळे त्या स्त्रीच्या मानसिक आरोग्यास इजा पोचणार असेल तरी गर्भपात करता येतो. उदा. एखाद्या कुमारिकेवर किंवा विधवेवर असा प्रसंग आला तर तिचा मानसिक तोल जाणे साजजिकच असते.
(क) एखाद्या स्त्रीवर किंवा मुलीवर बलात्कार झाला असेल तर अशा गर्भधारणेची समाप्ती करणे हे सामाजिक न्यायाचे व हिताचे आहे.
(ड) एखादी स्त्री किंवा तिचा पती ह्यांच्यात काही अनुवंशिक दोष असतात किंवा गरोदरपणी त्या स्त्रीला एखाद्या रोगासाठी असे उपचार औषधे घ्यावी लागतात की ज्यामुळे गर्भावर निश्चित दुष्परिणाम होतो व जन्मणारे मूल शारीरिक व्यंग किंवा पंगुत्व घेऊनच जन्मण्यापेक्षा गर्भपात करणेच जास्त हितावह असते. युरोपात थॅलिडोमाइड ह्या औषधाच्या वापरानंतर हातपाय नसलेली असंख्य मुले जन्मल्याचे लक्षात आले. ही घटना फार गंभीर स्वरूपाची आहे.
(इ) कुटुंब नियोजनाची साधने असफल ठरली गर्भपात करता येतो.एकूण कायदेशीर गर्भपाताची सोय अगदी योग्य अशा कारणांसाठीच उपलब्ध आहे. व उगाच गर्भपात करून येण्याची प्रवृत्ती वाढेल असे त्यात काही नाही.

गर्भपात केंद्र चालविण्याची परवानगी फक्त सुसज्ज हॉस्पिटलातच दिली जाते. तज्ज्ञ डॉक्टर, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, भूल देणारे तज्ज्ञ व रक्तदानाची सोय अशा ठिकाणी उपलब्ध असावी लागते.एखाद्या भोंदू वैद्याने किंवा दायीनें घडवून आणलेला गर्भपात आज सुद्धा बेकायदेशीर ठरतो.गर्भपात करण्यास वीस आठवडेपर्यंत सवलत असली तरी शक्यतो दहा आठवड्या पर्यंतच तो करण्यास सुलभ, स्त्रीच्या दृष्टीने बिनधोक असतो. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये फार वेळ राहण्याची आवश्यकता नसते व खर्चपण कमी येतो. ( हल्ली बऱ्याच रुग्णालयातून गर्भपात विनामूल्य केला जातो.)

गर्भपात करावयाचा असल्यास घ्यावयाची काळजी
गर्भपाताची आवश्यकता भासली तर अशा स्त्रियांनी पाळी चुकल्यानंतर ८-१५ दिवसांतच केन्द्रावर तपासणी करून योग्य तो निर्णय घ्यावा. गर्भपात कायदेशीर असला तरी वारंवार गर्भपात करून घेणे केव्हाही हितावह नाही. गर्भपातानंतर पुढे ज्यांना मुले हवीत त्यांनी असा निर्णय फार विचारपूर्वक करावा. गर्भपातानंतर ६-८ महिने तरी पुन्हा गर्भ न राहाण्याची खबरदारी घ्यायला हवी.

कृत्रिम गर्भपात करून घेतल्यानंतर आकस्मिक गर्भपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा दोनतीन मुले असतील त्यांनी कृत्रिम गर्भपातानंतर संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घ्यावी हे चांगले. ज्या स्त्रियांचे पूर्वी सिझेरिअन ऑपरेशन झाले आहे अशांनी कृत्रिम गर्भपात शक्यतो करून घेऊ नये. कुटुंबनियोजन साधनांचा वापर करावा व पुरेशी मुले झाली की कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घ्यावी.

गर्भपात कायदा नीतिमूल्ये
कृत्रिम गर्भपाताला कायद्याने काही विशिष्टा परिस्थितीतच मान्यता दिली आहे. तो स्वेच्छेने कोणालाही करून घेता येतो. अशी कल्पना करून घेणे चुकीचे आहे. कायद्यातील तरतुदीचे बंधन तज्ज्ञांना पण आहे. आणि म्हणूनच गर्भपाताच्या कायद्याने अनैतिकता वाढत जाईल ही भीती निराधार आहे. हा कायदा होण्यापूर्वी बेकायदेशीर गर्भपातामुळे अनेक स्त्रिया मुली मृत्युमुखी पडल्या. अनेक पालक आर्थिक संकटात सापडले. अनेक नवजात अर्भकांची हत्या होत होती. आणि अनाथ मुलांची संख्या वाढतच होती.

समाजातील अनीती ही तात्कालीन सामाजिक नीती विचार जीवन कलह आणि सिनेमारख्या प्रभावी लोकरंजन माध्यमांचा दुरुपयोग ह्यांचा परिपाक असतो. या कायद्याने अनीती कमी करता आली नाही तरी तिचे समाजावर होणारे दुष्परिणाम कमी करायला नक्कीच मदत झाली आहे.