Tag Archives: डोमकावळा

मोराची पिसे ल्यालेला डोमकावळा

एका डोमकावळ्यास असे वाटले की, आपण थोर व्हावे; आपल्या जातीचे लोक हलके, त्यांचा समागम करू नये. त्याने काही मोराची पिसे पैदा केली. ती आपल्या पंखांत रोवून तो मोरांच्या मंडळीत शिरला. हा डोमकावळा आहे, हे ओळखून सगळे मोर त्यासभोवती जमा झाले आणि त्यांनी त्यास प्रथम टोचून टोचून अर्धमेला केला. मग त्याने लावलेली मोराची पिसे बुचाडून घेऊन त्यास त्यांनी आपल्या मंडळीतून हाकलवून लावले.

अशी अवस्था झाल्यावर तो खिन्न होऊन आपल्या जातीच्या लोकांपाशी आला, तेव्हा त्यांस त्याचे पूर्वीचे ढोंग माहित असल्यामुळे, त्यांनी त्यास जवळ उभा केला नाही; आणि त्यांतील एका एका कावळ्याने त्याची छीः थू करून म्हटले, ‘रे मूर्खा, ईश्वराने तुला ज्या जातीत निर्माण केले, ती तू सोडली नसतीस, तर आज तुला हा अपमान का प्राप्त झाला असता?’

तात्पर्य : ईश्वराने आपणास ज्या स्थितीत निर्माण केले आहे ती कमी मानून दुसऱ्याचा थोरपणा आपल्या ठिकाणी ओढून आणणारा मनुष्य विपत्तीत पडतो. असा मनुष्य दोहींकडून फसतो; परजातीचे लोक त्याचा तिरस्कार व उपहास करतात आणि जातीद्रोही म्हणून त्याच्या जातीचे लोकही त्याचा अंगीकार करीत नाहीत.