Tag Archives: दिवेलागण

एक सायंकाळ

एक सायंकाळ घुटमळत राहते माझ्या
डोळ्याच्या मिटलेल्या पापणदारापाशी पुन्हा पुन्हा
ठाऊक नसतो तीला रस्ता उजेडाचा
फिरत राहते माझ्याच घरापाशी पुन्हा पुन्हा

ती माझ्यात इतकी शिरते खोल खोल की
मी तीला वेगळं करू शकत नाही माझ्यातून
मी जेव्हा बोलतो तेंव्हा माझ्या शब्दात ती भरते
एक कंपकापरी व्याकूळ दिवेलागण
मी जेव्हा चालतो तेव्हा ती माझ्या रस्त्यात आड येते

मग मी सोलू लागतो प्रकाशाच्या शेंगा
पण त्यातून अंधाराच्याच बिया निघतात
माझ्या अंगावरून तेंव्हा निथळत असतात
अंधारचे लहान लहान थेंब
मला जेव्हा नको नकोशी थेंब
मला जेव्हा नको नकोशी वाटते सायंकाळ
तेंव्हा तर हमखास येते मनाच्या पारापाशी पुन्हा पुन्हा