Tag Archives: दीपप्रज्वलन

वाढदिवस

आजकाल पाश्चात्त्य प्रभावामुळे मुलांचे वाढदिवस केक कापून व मेणबत्त्या विझवून अनेक घरांतून साजरे केले जाऊ लागले आहेत. आयुष्य एकेका वर्षाने कमी होत. – जीवनाचा इतका भाग कापला गेला आहे, आयुष्यातला प्रकाश संपत आला आहे असा निराशाजनक भाव त्यातून व्यक्त होतो. अन तोंडाने मात्र म्हटले जात असते, Happy Birthday to you. ‘ कृती व उक्ति यात केवढे अंतर ! दिवा विझविणे हे तर आपल्याकडे अशुभ मानले गेले आहे.

आम्हा हिंदूंची पद्धती दीपप्रज्वलनाची आहे. भाःरत – म्हणजेच आम्ही तेजाचे पूजक आहोत. वाढदिवसाच्या दिवशी सुंदर रांगोळी काढून, पाट मांडून त्यावर सुंदर शाल, त्यावर गव्हाचा व तांदळाचा चौक तयार करून त्यावर त्या व्यक्तीला बसवायचे आणि कुंकुमतिलक लावून अक्षता-ज्यांना क्षति नाही त्या अक्षता – लावायच्या व दीपज्योतीने ओवाळायचे, अशी आपली हिंदू पद्धती आहे. जीवन अक्षत-अक्षय आहे व दीपज्योतीप्रमाणेच ते स्वतः उजळून निघो व इतरांना प्रकाश देवो, अशी मंगल कामना त्यामागे आहे. औक्षणानंत्र वडील माणसांचे आशीर्वाद घ्यायचे. त्याआधी त्यांना वाकून, लीन हून नमस्कार करायचा . मग सुंदर रांगोळी काढून मिष्टान्नाचे जेवण सर्वांसह घ्यायचे व नव्याउत्साहाने ‘ कीर्ति मागे उरावी ’ या संकल्पाने जीवन जगायचे.

असे सुरेख संस्कार उथळ परानुकरणापायी व आधुनिकतेच्या खोट्या हव्यासापायी ‘ जुनाट ’ म्हणून झिडकारणे आपल्या कल्याणाचे नाही. जीवनाकडे बघण्याचा आशावादी दृष्टीकोनच परंपरागत संस्कारातून अंकुरित होतो. आजही आमचे खासगी वा सार्वजनिक कार्यक्रम दीपप्रज्वलनानेच सुरू होतात. ‘प्रकाश उजळो दिगदिगंती ’ हा भाव जागृत राहिल्यानेच आमची संस्कृती कितीतरी आक्रमणांना तोंड देत. विरोधी शक्तींशी झगडत जिवंत राहिलो आहे व जागे राहू तर ती चिरंजीव होईलच होईल. तमातून प्रकाशाकडे जाण्याची आज गरज आहे.