Tag Archives: दीर्घ

शुद्धलेखनाच्या आयचा घो!

तिडीक / पोटतिडीक

शुद्धलेखनाच्या आयचा घो! - भाग १

शुद्धलेखनाच्या आयचा घो! – भाग १

आई मराठीची शिक्षिका असल्यामुळे आणि वर्गातल्या मुलांचं शुद्धलेखन तपासण्याची जबाबदारी शाळेत पार पाडल्यामुळे ‘शुद्धलेखन’ हा एकूणच माझ्या जिव्हाळ्याचा विषय होता. पुढे संस्कृत शिकल्यावर तर संस्कृतधार्जिण्या मराठी शुद्धलेखनावर मी अधिकारवणीनं बोलू लागलो. कुणी ‘शारीरिक’ऐवजी ‘शारिरीक’ लिहिलं, तर माझा सात्विक संताप व्हायचा. ‘अशुद्ध’ पाट्या लावणाऱ्या अनेक दुकानदारांना भेटून मी पाट्या दुरुस्त करण्याची विनंती करायचो. इंग्रज स्पेलिंग्सबाबत तडजोड करत नाहीत, तर आपण शुद्धलेखनाच्या बाबतीत का करावी, असा सणसणीत सवाल हाणून मी बापड्या ‘अशुद्धां’ना चुप करायचो!

पण आता विचाराअंती माझी मतं दुसऱ्या टोकाला पोहोचली आहेत. शुद्धलेखन हा प्रकारच मराठीतून हद्दपार व्हायला हवा, अशी माझी इच्छा आहे. त्याला दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे शुद्धलेखनाच्या नियमांमधला फोलपणा माझ्या लक्षात आलाय. मराठीत उच्चारांप्रमाणेच शुद्धलेखन आहे, हे मला पूर्णतः मंजूर नाही. मग उच्चारांप्रमाणे नसलेल्या निरुपयोगी गोष्टी लक्षात ठेवून पुन्हा पुन्हा का लिहायच्या? त्यात शुद्धलेखनाचे नियम भयंकर संस्कृतधार्जिणे आहेत. मूळ प्राकृत शब्दांच्या तुलनेत संस्कृतातून आलेल्या शब्दांना विनाकारण जास्त महत्त्व देण्यात आलंय.

दुसरं कारण म्हणजे मराठी शुद्धलेखनाचे नियम अतिशय गुंतागुंतीच, प्रसंगी अतार्किक आहेत. सर्वसामान्य माणसाने हे सगळं लक्षात ठेवावं, ही अपेक्षाच मूर्खपणाची आहे! मग त्याने आपलं म्हणणं मांडण्यासाठी लिहायची हिंमत केलीच, तर त्याच्या ‘अशुद्ध’लेखनाची थट्टा उडवायची, हे अन्यायकारक आहे. इंग्रजीचा वाढता प्रसार, त्यामुळे मराठीचा कमी होत चाललेला वापर, त्यात रोमन लिपीतून मराठी लिहिण्याकडे असलेला तरुणांचा सोयिस्कर कल, अशा सर्व गोष्टींचा विचार करता, देवनागरी मराठीचा लोकांनी जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी त्यांना प्रवृत्त करणं गरजेचं आहे. किमान, ते परावृत्त होणार नाहीत, याची तरी खबरदारी घेतली गेली पाहिजे.

यावर उपाय एकच. ‘र्‍हस्व’ आणि ‘दीर्घ’ या दोघांची हकालपट्टी करणे! तुमचा विश्वास बसणार नाही, पण मराठी आधी ज्या मोडी लिपीत लिहिली जायची, त्यात ही भानगडच नव्हती! फक्त एक इकार आणि एक उकार! पण मोडी मोडीत काढून आपण संस्कृतची देवनागरी लिपी स्वीकारली आणि त्यासोबत र्‍हस्व-दीर्घचं लंटाबरही ओढावून घेतलं! जर आता आपण ही भानगड निकालात काढली, फक्त पहिला इकार आणि पहिला उकार राहील. सुरुवातीला थोडं विचित्र वाटेल, पण नंतर आपल्याला सवय होइल. आनंदाची गोष्ट म्हणजे कुणि काहिहि अशुद्ध लिहिणार नाहि. तुम्हि लिहाल, ते सारं शुद्धच असेल!