Tag Archives: नटसम्राट

नटसम्राट झुकले विनोदसम्राट समोर

दिलीप प्रभावळकर  आणि  डॉ. श्रीराम लागू

दिलीप प्रभावळकर आणि डॉ. श्रीराम लागू

एक नटसम्राट तर दुसरे विनोदसम्राट… जेव्हा विनोदसम्राटाच्या अभिनय पैलूंनी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले तेव्हा कुठलाही मोठेपणा न बाळगता नटसम्राट मधल्या प्रेक्षकाने झुकून विनोदसम्राटाला दाद दिली. हा अविस्मरणीय क्षण पुणेकरांनी मंगळवारी आपल्या डोळ्यात साठवून घेतला.

‘भेट दिग्गजांची’ हा कार्यक्रम ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि दिलीप प्रभावळकर या उपस्थितीने खऱ्या अर्थाने सार्थकी ठरला. दिलीप प्रभावळकर यांच्या मुलाखतीचे आयोजन जनसेवा फाऊंडेशनतर्फे करण्यात आले होते. प्रभावळकरांच्या मुलाखतीतून चिमणराव, एक डाव भुताचा मधील मास्तुरे, चौकट राजा, तात्या विंचू, बालनाट्यातील चेटकीण, हसवाफसवी मधील विविधांगी भूमिका, मुन्नाभाई चित्रपटातील महात्मा गांधी, रसिकांनी भरभरून प्रेम केलेले बाल गंगाधर टिपरे अशा विविध व्यक्तीरेखांचे पैलू उलगडले. घरातील वृद्धांनी आपल्या मुला-बाळांना घडवून आयुष्यात खूप कष्ट सोसलेले असतात. ते सामाजिक जीवनात मोठे नसले तरी त्यांचा आदर करून त्यांची काळजी घेण्याचा संदेश प्रभावळकरांनी गंगाधर टिपरेंच्या अभिनयातून दिला. त्यांच्या या संदेशाने उपस्थितांच्या डोळ्यात टचकन पाणी आले आणि खुद्द डॉ. श्रीराम लागू यांनी प्रभावळकरांना नतमस्तक होत त्यांना दाद दिली.

या कार्यक्रमात प्रभावळकरांच्या चिरतरुण दिसण्याची तुलना अभिनेत्री रेखा यांच्याशी करण्यात आली. तेव्हा प्रभावळकर म्हणाले की त्यांच्यासह हेमामालिनी यांनीही स्वतःला चांगलं ‘मेन्टेन’ केले आहे. प्रभावळकर यांनी सांगितले की, त्यांच्या भूमिकांवर पुलंच्या लिखाणाची छाप आहे.

प्रभावळकर यांच्याशी डॉ. मंदार परांजपे यांनी संवाद साधला. ज्येष्ठ अभिनेत्री दिपा लागू, ज्येष्ठ सराफ व्यावसायिक दाजीकाका गाडगीळ, वनराईचे अध्यक्ष मोहन धारिया, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा उपस्थित होते.