Tag Archives: पंढरी

अरे, मला सोड

आषाढी एकादशी सात-आठ दिवसांवर येऊन थडकली होती. संत तुकाराम महाराज देहु गावतील एका रस्त्यानं कुठेतरी चालले होते. तेवड्यात देहू गावचा पांडोबा पाटील समोरुन येत असलेला त्यांच्या द्रुष्टीस पड्ला. तो जवळ येताच, तुकोबांनी त्याला विचारलं, ‘काय पाटील ! या आषाढी एकादशीला पंढरीस येणार का?’

पाटील म्हणाला, ‘तुकोबा, आमचं काय तुमच्यासारखं थोडचं आहे ? आम्हाला आमच्या संसारानं घट्ट धरुन ठेवलं आहे. आम्हाला तुमच्या दिंडीबरोबर पंढरपूरास यायला कसं जमणारं ?’पाटलाचं ते उत्तर ऎकून, त्या वेळी तुकोबा त्याला काहीच बोलले नाहीत; परंतू दुसऱ्या दिवशी तुकोबा गावाबाहेरच्या एका रस्त्यानं जात असता, त्यांना तोच पाटील दुरुन त्यांच्याच दिशेनं येत असलेला दृष्टीस पडला.

त्याला पाहताच तुकोबांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका नांदुरकीच्य झाडाच्या खोडाला बाहूत घट्ट पकडलं, आणि ते ‘सोड ! सोड ! अरे सोड की !’ असं त्या झाडाला उद्देशून म्हणत, त्या झाडापासून आपली सुटका करुन घेण्यासाठी अटीतटीची धडपड करु लागले.पाटील जवळ आला, आणि तो अजब प्रकार पाहून खदखदून हसत म्हणाला, ‘तुकोबा, डोकं फ़िरलयं की काय तुमचं ? अहो, तुम्हीच त्या झाडाला घट्ट मिठी मारता आणि वर तुम्हीच त्याला ‘सोड ! सोड !’ म्हणून, तुम्हाला सोडायला सांगता ? जरा हात काढून घ्या, म्हणजे पुढली वाट चालायला मोकळे व्हाल.’

यावर लगेच तुकोबा म्हणाले, ‘मग पाटील, तुमची गतसुध्दा अशीच नाही का ? तुम्हीच संसाराला घट्ट धरुन ठेवलयं, आणि वरं ‘संसारानं मला धरुन ठेवलंय’ अशी उगाच उलटी ओरड तुम्हीच करता ! अहो, संसारातून थोडाअ काळ आपलं मन बाहेर काढा म्हणजे पंढरीस जाणाऱ्या आमच्या दिंडीबरोबर यायला, तुम्हीही मोकळे व्हाल.’