Tag Archives: प्रार्थना

अनुजच्या मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

अनुज बिडवे आणि कियारान स्टेपलटन

अनुज बिडवे आणि कियारान स्टेपलटन

अनुज बिडवे याची हत्या करणाऱ्या कियारान स्टेपलटन याला शुक्रवारी मॅंचेस्टर क्राऊन कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

अनुजच्या खून प्रकरणात स्टेपलटन याला गुरुवारी दोषी ठरविण्यात आले होते. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्याला किमान तीस वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. शुक्रवारी कोर्टात आल्यावर स्टेपलटनच्या चेहेऱ्यावर हास्य होते. शिक्षा सुनावल्यानंतर स्टेपलटन अनुजच्या कुटुंबीयांकडे हसत हसत पाहत कोर्टाच्या बाहेर पडला. न्यायाधीश टिमोथी किंग त्याला म्हणाले की, ‘लोकांना तुझा धोका नसल्याची खात्री पटल्यावरच आम्ही तुला सोडू’. ‘माझ्या निकालात मी नमूद केले आहे की, हे उतावीळपणे केलेले कृत्य नसून थंड रक्ताने केलेला नियंत्रित हल्ला आहे,’ असेही ते पुढे म्हणाले. अनुजचा खून केल्यावर स्टेपलटनच्या चेहेऱ्यावर आसूरी आनंद दिसत होता. यावरुन हे दिसून येते की तो अत्यंत कठोर, तिरस्करणीय आहे, असे त्यांनी म्हटले. ‘असे लक्षात येते की मि. बिडवे यांच्या हत्येबाबत तुला घमेंड होती,’ असे ते म्हणाले.

कोर्टाने यापूर्वीच मान्य केले होते की स्टेपलटन याने अत्यंत हिंसक कृत्य केले असून तो अत्यंत धोकादायक माणूस आहे. त्याच्याकडून अन्य नागरिकांसाठी खूप मोठा धोका आहे. दरम्यान, अनुजचे आई-वडील सुनावणीदरम्यान उपस्थित होते. ज्या ठिकाणी अनुजची हत्या झाली, त्या ठिकाणी त्यांनी गुरुवारी रात्री प्रार्थना करुन फुले वाहिली.