Tag Archives: बायको

केवळ बयकोचा भाऊ

एकदा अकबर बादशहाची बेगम त्याला म्हणाली, ‘आपलं माझ्यावर जर खरं प्रेम असेल, तर माझा भाऊ शेरखान याला बिरबलाच्य ऎवजी वझीर करावं.’

बिरबलाची इतर सर्व दृष्टीने योग्यता किती मोठी आहे. तो किती चतूर आहे, वगैरे सर्व गोष्टी बादशहानं बेगमला सांगून पहिल्या, पण ती आपला हट्ट सोडीना. अखेर बादशहानं तिला विचारलं. ‘तूच विचार कर, की बिरबलाला त्याच्या जागेवरुन काढण्यासाठी काही कारण तर हवं ना ? केवळ तुझ्या हट्टाखातर जर मी त्याला काढलं, तर लोक मला बाईलवेडा म्हणतील. तेव्हा तूच मला सांग, की कोणतं कारण पुढं करुन, मी त्याला त्या पदावरुन काढून टाकू ?’

बेगम म्हणाली, ‘आपण लटकचं भांडण करुन, दोन-तीन दिवस अबोला धरुल्यानंतर आपण बिरबलाला सांगा, बिरबल ! बेगमने माझ्याशी विनाकारण भांडूण अबोला धरला आहे. तेव्हा तिने माझ्याकडे येऊन माझी माफ़ी मागावी व यापुढं चांगले वागण्याचे मला वचन द्यावे, यासाठी तू मध्यस्थी कर. तुला यश आले तर ठीक, नाहीतर मी तुला तुझ्या सध्याच्या पदावरुन काढून टाकीन.’

बेगम उत्साहानं पुढं सांगू लागली, ‘आणु बरं का? आपलं वझीरपद टिकावं, म्हणून बिरबल माझ्याकडे येऊन मी आपण सांगितल्याप्रमाणे वागावं यासाठी हरतऱ्हेने मला समजावण्याचा प्रयत्न करील, पण मी त्याला जराही दाद देणार नाही. मग आपल्याला हे कारण मिळून, त्याला नोकरीवरुन काढून त्याच्या जागी माझ्या भावाला नेमता येईल.’

बेगमनं फ़ारच डोकं उठविल्यामुळं अखेर बादशहानं तिच्या म्हणण्याप्रमाणे खोटं भांडून व तिच्याशी दोन-तीन दिवस अबोला धरुन, बिरबलाला समेट घडवून आणण्यास सांगितले. समेट न घडल्यास नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकीही त्यानं त्याला दिली.

चतुर बिरबलानं हेरलं, की हे बेगमचंच कारस्थान आहे. त्यानं आपल्या विश्वासातल्या एका नोकराला आपण बादशहाच्या बेगमकडे गेल्यावर थोड्याच वेळात तिथे येऊन काय बोलायचं हे पढवून ठेवलं, आणि तो त्या बेगमकडे गेला.

बेगमनं बादशहाची माफ़ी मागून त्याच्याशी यापुढे प्रेमाने वागण्याचे त्याला वचन द्यावे. यासाठी तिचे मन वळवीत असता,आणि ती त्याचे म्हणणे धुडकावून लावीत असता, तो सेवक त्या ठिकाणी आला आणि बिरबलाने पढवून ठेवल्याप्रमाणे, बेगमने ऎकू जाईल एवढ्याच बारीक आवाजात त्याला म्हणाला, ‘बिरबलजी, खाविंदानी सांगितलंय शादीची तयारी झाली आहे. मौलवीही आले आहेत. तेव्हा त्या सुस्वभावी व समंजस तरुणीला लवकरात लवकर तुम्ही स्वत: घेऊन त्या ठरलेल्या ठिकाणी या. माझ्यावर पावलोपावली रुसणाऱ्या व माझ्या कारभारात येता जाता लुडबूड करु पाहणाऱ्या बेगमेचा आता मला वीट आला आहे.’

त्या सेवकाचं बोलणं पूर्ण होऊ दिल्यावर बिरबल त्याच्यावर उगाचच खेकसला, ‘मुर्खा ! कुठे काय बोलायचं, याचं तुला भान आहे की नाही ? खाविंदाचा हा निरोप तू मला खुद्द बेगमसाहेबांच्या समोर सांगतोस ? हो पुढे, मी येतो ?’, बिरबल एवढंच म्हणाला आणि बेगमेला प्रश्न विचारायची संधी न देता, तिथून निघून गेला.

‘खाविंदानी दुसरं लग्न करायचं ठरविलेलं दिसतयं’ अशी खात्री होऊन, ती बेगम तशीच बादशहाकडे गेली व त्याची क्षमा मागून रडत रडत म्हणाली, ‘स्वामी ! मी आपली अगदी मनापासून माफ़ी मागते आणि यापुढं असं न वागण्याचं आपल्याला वचनं देते, पण आपण मला सवत आणू नये.’

‘दुसरी शादी ? तुला घाबरवून सोडण्यासाठी, कुणीतरी खोटंच सांगितलेलं दिसतंय ! अकबर म्हणाला.
मग बेगमेनं घडलेला प्रकार सांगताच, बादशहा म्हणाला तिला म्ह्नणाला, ‘तू माझी क्षमा मागावीस व यापुढे चांगले वागण्याचे मला वचन द्यावेस, यासाठी मध्यस्थी करण्याची जी जबाबदारी आपण बिरबलावर टाकली होती, ती त्याने अशा चातुर्याने पार पाडली ना ? मग अशा चतुर बिरबलाला वझीर पदावरुन काढू आणि केवळ बायकोचा भाऊ म्हणून खेरखानाला त्या पदी चढवू ?’