Tag Archives: बालगंधर्व संगीत रसिक मंडळ

आजपासून गंधर्व नाटक मंडळीची शताब्दी

गोविंदराव टेंबे, गणपतराव बोडस आणि बालगंधर्व

गुरुवारपासून (ता. ५) नटसम्राट बालगंधर्व, गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे या तीन दिग्गजांनी एकत्र येऊन ‘गंधर्व नाटक मंडळी’ ही जी नाट्यसंस्था स्थापन केली, तीचे शताब्दी वर्ष सुरु होत आहे. या नाट्य संस्थेने रंगभूमीवर संशयकल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला अशी दर्जेदार संगीत नाटके सादर करुन ती अजरामरही केली. पण काळाच्या ओघामुळे आज ही नाट्य संस्था अस्तित्वात नाही.

ह्या तीनही दिग्गजांची किर्लोस्कर नाटक मंडळाशी मतभेद झाल्यानंतर ते या मंडळाच्या बाहेर पडले व ‘गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना ५ जुलै १९१३ रोजी केली. हा सोहळा साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकर, नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर, बळवंत पेठे, बाबासाहेब धारकर अशा अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत बुधवारपेठेतील त्या वेळच्या माळी धर्मशाळेत पार पडला होता. द्रौपदी, मेनका, अशा-निराशा, सावित्री, कान्होपात्रा, नंदकुमार अशी अनेक नाटके या संस्थेने रंगमंचावर आणली आणि नाट्य क्षेत्रात नवा घडला होता.

‘गंधर्व नाटक मंडळी बाल गंधर्वांच्या निधनानंतर बंद पडली. पण अनेकांना प्रणा देण्याचे काम या संस्थेने आणि बालगंधर्व, बोडस आणि टेंबे यांनी केले. विचारांना एक नवी दिशा दिली. नाट्य क्षेत्रात तो विचार घेऊन अनेक जण कार्यरत आहेत. बालगंधर्व संगीत रसिक मंडळ व इतर नाट्य संस्था हाच विचार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संस्थेच्या शताब्दीनिमित्त पुण्यात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत,’ असे बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर म्हणाले.