Tag Archives: बालगीत

बालगीत

गीतकार जगदीश खेबुडकर यांचे निधन

गीतकार जगदीश खेबुडकर यांचे निधन

गीतकार जगदीश खेबुडकर यांचे निधन

लावणीपासून बालगीत आणि गण-गवळणींपासून देशभक्ती, भक्तिगीतांपर्यंत गीतलेखनाचे सर्वांत जास्त प्रकार वापरून गेली पाच दशके मराठी गीतरसिकांना मोहित करणारे असामान्य प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर तथा मराठी चित्रसृष्टीचे ‘नाना’ यांचे आज कोल्हापुरातील आधार रुग्णालयात मूत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. खेबुडकरांच्या निधनाबद्दल मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांनी तीक्र शोक व्यक्त केला आहे.

 

‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’ या पहिल्याच लावणीच्या ठसक्याने मराठी गीतरसिकांना वेड लावले. ‘सामना’, ‘पिंजरा’, ‘साधी माणसं’ अशा सुमारे साडेतीनशे चित्रपटांसाठी जगदीश खेबुडकर यांनी तब्बल अडीच हजारांवर गाणी लिहिली. यांत ‘तुम्हावर केली मर्जी मी बहाल’, ‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला’ अशा एकाहून एक सरस लावण्यांबरोबर ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’, ‘मला हे दत्तगुरू दिसले’ यांसारखी भक्तिगीते, तर ‘राजा ललकारी अशी दे’, ‘ही कशानं धुंदी आली’, ‘धुंदी कळ्यांना’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘बाई बाई… मनमोराचा’, ‘आकाशी झेप घेरे पाखरा’ अशा सर्वांगसुंदर गाण्यांचा समावेश आहे.

आजवर कोणत्याही मराठी गीतकाराने खेबुडकर यांच्याइतके काव्यप्रकार वापरले नाहीत. गण-गवळण, लावणी, भारुड, गोंधळ, सवाल-जवाब, बालगीत, प्रेमगीत, स्फूर्तिगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीत, मुक्तछंद, अभंग अशा मराठीत यच्चयावत काव्यप्रकारांत खेबुडकरांनी आपल्या शब्दसामर्थ्याने असामान्य गीते लिहिली. या काव्यसांभाराला तब्बल ४८ संगीतकारांचे संगीत मिळाले आणि ३६ गायक आणि ३६ गायिकांनी ही गीते सुमधुर बनवली. व्ही. शांताराम, पेंढारकर, दादा कोंडके, शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके अशा दिग्गजांबरोबर जगदीश खेबुडकर यांनी जसे काम केले तसेच डॉ. अशोक पत्की, ‘पानिपत’कार विश्‍वास पाटील, गायक रवींद्र साठे, संगीतकार अजय-अतुल यांनाही अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन केले. कमल हसन यांच्या ‘हे राम’ चित्रपटासाठी खेबुडकर यांनी गीतेेही लिहिली होती.

जगदीश गोविंद खेबुडकर यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात १० मे १९३२ रोजी हळदी, ता. करवीर येथे सामान्य कुटुंबात झाला. वडील इंग्रजी राजवटीत १५ रुपये वेतनावर प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळे मराठीचे बाळकडू घरीच मिळाले. बालपण छोट्याशा ग्रामीण भागात गेल्याने बारा बलुतेदारांची लोकप्रिय गीते ऐकल्याने ते काव्यबीज पुढे खेबुडकर यांनी आपल्या एकापेक्षा एक गीतांतून अजरामर केले. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी (१९४८) मध्ये गांधी हत्याकांडात त्यांचे घर जळाले अन् त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांना आयुष्यातली पहिली कविता ‘मानवते तु विधवा झालीस’ सुचली. ‘काशीला श्रावण बाळ निघाला…’, ‘आज मरूनीया जीव झाला मोकळा…’, ‘जग ही पैशाची किमया…’, ‘नको नको बनू आंधळा…’, ‘आमुचा जीवन प्याला….’, ‘जागा हो माणसा…’, ‘दिला मृगानं हुंदका…’ अशा असंख्य कविता त्यांनी रचल्या. त्यांच्या कवितांना इतका बहर होता की, ते दिवसाला १० ते ११ कविता लिहू लागले होते.

१९५६ मध्ये आकाशवाणीवर खेबुडकर यांचे पहिलेच गीत ऐकून नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी चित्रपटातील पहिले गीत लिहिण्याची संधी दिली. सांगली येथे सन १९६० साली ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटासाठी लावणी लिहिण्याची संधी दिली. आयुष्यातील पहिली लावणी लिहिण्याचे आव्हान स्वीकारून अस्सल कोल्हापुरी नजराणाच खेबुडकर यांच्या लेखणीतून प्रकट झाला.

गेल्या ५९ वर्षांत खद्बुडकर यांचा राज्य शासनाचे अकरा, ‘रसरंग फाळके’, चित्रपट महामंडळाचे दोन, ‘गदिमा जीवनगौरव’, ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’, ‘कोल्हापूरभूषण’, ‘मृत्युंजय’, ‘सुरसिंगार संसद’, पुणे फेस्टिव्हल, ‘छत्रपती शाहू पुरस्कार’, ‘करवीरभूषण’, ‘साहित्य पुरस्कार’, ‘मार्मिक गौरवचिन्ह’, ‘लावणीरत्न’, ‘नटराज’, केंद्र शासन, ‘कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार’, ‘यशवंतराव चव्हाण साहित्यगौरव’ असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

जगदीश खेबूडकरांची गाजलेली गाणी

 • बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला
 • धुंद एकांत हा
 • ऐरणीच्या देवा तुला
 • चंद्र आहे साक्षीला
 • विठू माऊली तू माऊली जगाची
 • आज प्रीतीला पंख हे लाभले रे
 • मी आज फूल झाले
 • स्वप्नात रंगले मी
 • या मीलनी रात्र आज रंगली
 • कल्पनेचा कुंचला
 • स्वप्नात साजणा येशील का
 • नाचूू किती कंबर लचकली
 • सख्या रे घायाळ मी हरीणी
 • संसार मांडीते
 • हवास मज तू
 • अशी कशी ओढ बाई
 • अरे अरे पावट्या
 • रुणूझुणूत्या पाखरा
 • प्रिया सखी चंद्रमुखी
 • या रावजी बसा भावजी
 • मला झोंबतो गारवा
 • एक लाजरा न साजरा मुखडा
 • झनझन झननन छेडिल्या तारा
 • आली नार ठुमकत मुरकत
 • तुम्हावर केली मी मर्जी बहाल
 • आकाशी झेप घे रे पाखरा
 • मला हे दत्तगुरू दिसले
 • दाजिबा हे वागणं बरं नव्ह
 • कशी नशिबाने थट्टा आज मांडली
 • ही कशानं धुंदी आली
 • सावधान होई वेड्या
 • राजा ललकारी अशी दे
 • दिसला गं बाई दिसला
 • छबीदार छबी मी तोऱ्यात उभी
 • मला लागली कुणाची उचकी
 • नीळे गगन नीळी धरा
 • दे रे कान्हा चोळी अन लुगडी
 • कुण्या गावाचं आलं पाखरू
 • दिवा पाहूनी लक्ष्मी येते
 • राम राम पाव्हणं
 • हलके हलके जोजवा
 • ओवाळीते भाऊराया
 • मला हो म्हणतात लवंगी मिरची
 • आला गं चावट भुंगा