Tag Archives: मंगेश पाडगांवकर

असा बेभान हा वारा

असा बेभान हा वारा, कुठें ही नाव मी नेऊं ?
नदीला पूर आलेला, कशी येऊं, कशी येऊं? ॥धृ॥

जटा पिंजून या लाटा, विखाळी झेंप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जिवाचें फूल हें माझ्या, तुझ्या पायीं कशी ठेवूं ? ॥१॥

कुळाचे, लौकिकाचे मी, क्षणीं हे तोडिले धागे
बुडालें गांव तें आतां, बुडालें नांवही मागें
दिलें हें दान दैवानें, करीं माझ्या कशी येऊं ? ॥२॥

जगाच्या क्रूर शापांचे, जिव्हारीं झेलले भाले
तुझें सौभाग्य ल्याया हें, तुझी होऊन मी आलें
तुझें तूं घे उरीं आतां, किती मी हांक ही देऊ ? ॥३॥