Tag Archives: मकरसंक्रांत

संक्रांत एक गोड सण

मकरसंक्रांत तिळगूळ

मकरसंक्रांत तिळगूळ

पौष महिना आला रे आला की सगळीकडे संक्रांत तिळगूळ, लुटालुटीच्या वस्तू ह्यांची एकच चर्चा सुरू होते.

दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रांत येते. संक्रांत म्हणजे काय? आणि ह्या संक्रांतीला मकर संक्रांत असं कां म्हणतात. हा प्रश्न आपल्या मनांत येणं स्वाभाविक आहे.

संक्रांत म्हणजे काय! तर संक्रांत म्हणजे संक्रमण, मार्ग क्रमून जाणे किंवा ओलांडून जाणे. तसं म्हटलं तर प्रत्येक महिन्यांतच संक्रांत येत असते. म्हणजेच सुर्याचे एका राशीतून दुसर्‍या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमणा होत असते.

सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकरसंक्रांत.

संक्रांतीचा आदला दिवस हा भोगी म्हणून साजरा करतात. ह्या दिवशी तीळमिश्रीत पाण्याने स्नान करायचे. तीळ लावलली भाकरी, वांग्याचे भरीत अन लेकुरवाळी भाजी करण्याची प्रथा आहे.

तिळाची गरम गरम भाकरी भरीत चविष्ट भाजी, सोबत लोणी मग काय! ह्या जेवणाला गंमत नं आली तरच नवल.

संक्रांतीचा आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ज्याप्रमाणे आपण दसर्‍याला मोठ्या लोकांना सोनं देऊन त्यांचे आशिर्वाद घ्यायला जातो. त्याचप्रमाणे संक्रांतीला ही त्यांच्याकडे जायचे का? तर तिळगूळ घ्यायला.

ही मोठी माणसं नुसता आपल्या हातावर रंगीत हलवा, तिळगूळाची वडी देत नाहीत त्यासोबतच ते आपल्याला “ तिळगूळ घ्या अन गोड बोला” असा एक संदेशही देतात. परस्परांत प्रेम वाढवा, प्रेम जपा, गोड गोला कुणाचंही मन दुखवू नका असा एक वसा ही देतात.

शरीरावर एकवेळ शस्त्रानं झालेली जखम ही कालांतराने बरी होते. भरून येते पण…… शब्दांनी दुखावलेली मनं-तुटलेली नाती-दुखावलेली माणसे पुन्हा एकत्र जोडता येत नाहीत. तेव्हा दुसर्‍याच्या मनाला लागेल, टोचेल, बोचेल, परस्परांत कटुता येईल असं बोलू नका. दसर्‍याला दुखवू नका हाच संदेश त्या हातावरच्या तिळगूळाचा असतो. तीळाची स्निग्धता आणि साखरेचा गोडवा हा आपल्या आचार विचार अन वाणीतून दिसू द्या हेच संक्रांत सांगते. हे वैचारिक संक्रमण ह्या सणाप्रमाणे अभिप्रेत आहे.

“माणसं तोडत नव्हेतर माणसं जोडत जा” हाच ह्या सणाचा सांगावा आहे. लहान लहान मुलं-मुलीं जेव्हा नटून-थटून, नवे ड्रेस घालून छोट्या डब्यातून एकमेकांना तिळगूळ देत फिरतात. तिळगूळ देताना आणि घेताताना त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळतो.

ही चिमणी पाखर जेव्हा परस्परांना तिळगूळ देतात आणि-
आमचे तिळगूळ सांडू नका । आमच्याशी भांडू नका ॥
अशी प्रेमळ विनवणी एकमेकांना करतात. तेव्हा क्षणभर असं वाटतं की खरंच लहानां इतकीच मोठी माणसं ही जर भावनाशील झाली तर? त्यांनीही जर हा संक्रांतीचा संदेश आचरणांत आणला तर खर्‍या अर्थानं हा सण साजरा केल्याच समाधान मिळाल्या वाचून राहणार नाही.

संक्रांत आणखी एका गोष्टीमुळे लक्षात राहते. ती गोष्ट म्हणजे संक्रांतीच हळदीकुंकू लुटलेल्या वस्तू. ह्या कृतींमधूनच दान देण्याची सहकार्याची भावना वाढवली जाते. महिला विश्वांत ह्या हळदीकुंकू समारंभाचा आनंद काही वेगळाच. कपाळीचं हळदीकुंकू हे एका स्त्रीसाठी किती लाख मोलाचे असते हे पटवून देणारा हा एक गोड सण.