Tag Archives: मडकी

रामाचा राम राम

एक श्रीमंत मनुष्य अतिशय बनेल व लुच्चा होता. याने आपल्या घराच्या पुढल्या अंगणाच्या फ़ाटकावर एक फ़लक लावला होता- ‘नोकर हवा. मासिक वेतन रुपये तीन हजार, अट एकच. महिन्यातील कुठल्याही दिवशी करता आलं नाही, तर त्याला झालेल्या दिवसाचं वेतन न देता कामावरुन काढून टाकण्यात येईल.’

चांगल्या वेतनाच्या आशेनं त्याच्याकडे चांगले सात-आठ उमेदवार आले. पण प्रत्येक नोकराकडून तो जवळजवळ महिनाभर सडकून काम करुन घेई आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी तो त्याला ‘हाय हाय !’ आणि ‘अरे बाप रे !’ या दोन वस्तू आणण्याचा हुकुम सोडी. या दोन गोष्टी कुणालाच ठावूक नसल्याने, कुठल्याच नोकराला ते काम करता येणे अशक्य होई. मग तो लुच्चा धनिक त्या नोकराला केलेल्या दिवसांचं वेतन न देता कामावरुन काढून टाकी. अशा तऱ्हेने सात आठ नोकरांकडून त्या बनेक धनवंताने चांगले सात आठ महिने फ़ुकट काम करुन घेतले. पण रामचंद्र नावाच्या एका चतूर तरुणाच्या कानी ही गोष्ट गेली. तो त्या बनेल माणसाकडे गेला आणि त्याने त्याची अट मान्य करुन, त्याच्याकडली नोकरी पत्करली.

रामाकडून महिनाभर मरेमरेतो काम करुन घेऊन जेव्हा त्या लुच्चा मालकानं महिन्याच्या शेवटल्या दिवशी त्याला ‘हाय हाय’ व ‘अरे बाप रे !’ या दोन गोष्टी आणायला सांगितल्या. तेव्हा रामा म्हणाला, ‘शेट, या भलत्याच दुर्मीळ गोष्टी तुम्ही मला आणायला सांगितल्यात. तरीपण बघतो मी प्रयत्न करुन.’ असं म्हणून रामा घराबाहेर पडला आणि आपल्या एका मित्राच्या घरी गेला. त्या मित्राला अगोदरच सांगून ठेवल्याप्रमाणे, त्याने घरी तयार करुन ठेवलेली दोन मडकी रामाने हाती घेतली आणि तो परत मालकाकडे आला.

ती दोन मडकी पाहून मालकानं मोठ्या उत्कंठेन विचारलं, ‘रामा, या मडक्यात काय आहे ?’
रामा म्हणाला, ‘या काळ्या कापडाच्या दादरानं तोंड बंद केलेल्या मडक्यांत तुम्हाला ‘हाय हाय’ मिळेल आणि त्या पिवळ्या कापडाच्या दादरानं तोंड बंद केलेल्या मडक्यात हात घातलात की तुम्हाला ‘अरे बाप रे !’ मिळेल.’

मालकानं पहिल्या मडक्याच्या तोंडावरचं फ़डकं काढून टाकून, आत असलेल्या गवतातून मडक्याच्या तळात हात घालताच, तिथे असलेल्या विचंवानं त्याला सणसणून नांगी मारली. त्याबरोबर मालक ओरडला ‘हाय हाय !’

रामानं विचारलं, ‘धनी ! मिळालं ना तुम्हाला हाय हाय ? आता असाच हात त्या दुसऱ्या मडक्यात घाला आणि त्यातून ‘अरे बाप रे’ काढा. विचंवाच्या दंशानं झणझणत असलेला आपला हात डाव्या बगलेत दाबून धरुन मालक म्हणाला, ‘मी नाही घालणार माझा हात त्या दुसऱ्या मडक्यात, तुला वाटलं तर तूच घाल .’

रामानं त्या मडक्याच्या तोंडावरचं पिवळ्या फ़डक्याचं आच्छादन बाजूला करताच, आतून एका पिवळया जर्द सर्पानं बाहेर फ़णा काढला. ते पाहून मालकाच्या तोंडून सहजगत्या भीतीचे उदगार निघाले ‘अरे बाप रे !’रामानं विचारलं, ‘मिळालं ना ‘अरे बाप रे ?’ आता काढा महिन्याचा पगार रुपये तीन हजार.’ तोंडातून एकही शब्द न काढता त्या मालकानं घरातून तीन हजार रुपये आणून व ते त्या चतूर रामाच्या हातावर ठेवून, तो त्याला म्हणाला, ‘मिळाला ना पगार तुला ? आता ही नोकरी तू सोडून, पण त्या विंचवाला व नागोबाला बरोबर घेऊन, इथून निघून जा.’

रामा म्हणाला, ‘मी काही माझ्या कामात कसूर केलेली नाही. मग मी नोकरी कशाला सोडू ? त्यातून पूर्वसुचना न देता मला नोकरी सोडायला सांगितल्याबद्दल तुम्ही मला पुढल्या महिन्याचाही पुर्ण पगार देत असाल, तर मी जातो.’ रामाला घाबरलेल्या मालकानं त्याचं तेही म्हणणं मान्य केलं, मग तोही पगार घेतला आणि रामाने मालकाला रामराम करुन त्याचा निरोप घेतला.