Tag Archives: महागणपती

रांजणगावाचा महागणपती

पुरातन काळी गृत्समद नावाच्या ऋषींचा मुलगा थोर गणेशभक्त होता. त्याने ‘ॐगणांना त्या…’ हा गणेशमंत्राचा जप केला. त्याचे कठोर तप पाहून श्रीगणेशाने प्रसन्न होऊन त्याला अलौकिक सामर्थ्य देऊन सोने, रुपे व लोखंड या तीन धातूंची तीन नगरे ‘त्रिपुरे’ बनवून दिली.

श्रीगणेशाकडून वर मिळाल्याने हा त्रिपुराचा राजा पुढे फारच उन्मत्त झाला. त्याने पृथ्वीवर सर्वत्र उच्छाद मांडला. पृथ्वीवासियाम्चा त्याने अनिन्वित छळ सुरू केला. देवांनाही त्याने सळो की पळो करून सोडले. त्रिपुरासूराने इंद्राचे आसनही काबीज केले. त्याने देवांचे अधिकार राक्षसांना देऊन टाकले. त्यामुळे भयभीत झालेल्या देवांनी शंकराची आराधना केली.

तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या त्रिशुळाने धातूंची ती तीन त्रिपुरे उध्वस्त करून त्रिपुरासूराचा वध केला. त्रिपुरासूर हा गणेशभक्त असला तरी त्याने गणेशकृपेचा दुरुपयोग केल्याने त्याला शासन करणे महादेवास शक्य झाले.

म्हणूनच सुजनभक्तांवर कृपा करणाऱ्या ‘श्रीमहागणपतीची’ रांजणगाव येथे लोकांनी प्रतिष्ठापना केली.