Tag Archives: मासेमारी

कोकणच्या समृद्धीचा मार्ग

विकासाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेली वीज राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी महत्त्वाची गरज आहे. आजची वीजेची निर्मिती व वीजेची उपलब्धता पाहता आपल्याला आणखी सुमारे ४००० मेगावॅट वीजेची नितांत आवश्यकता आहे. हे पाहता होऊ घातलेला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प निश्चितपणे राज्याला वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवेल व विकासाच्या बाबतीत उंच शिखरावर नेऊन बसवेल असा विश्वास रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव व्यक्त करीत आहेत.

विद्युत निर्मितीचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे होऊ घातलेला आहे. हा अणुऊर्जा प्रकल्प राज्याबरोबरच देशाचीही वीजेची गरज भागविण्यास मोलाचा ठरणार आहे.अणुऊर्जा प्रकल्पाचा आराखडा करताना व त्याची उभारणी करताना प्रत्यक्ष प्रकल्प सुरू झाल्यावर पर्यावरणाच्या संरक्षणाची तसेच मानवी आरोग्याच्या संरक्षणाचे व्यवस्थापन ही सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचे समजली जाते. या दृष्टीने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारताना शासनाच्या माध्यमातून सर्व गोष्टीची दक्षता घेतली जाणार आहे. जैतापूर येथील नियोजित अणुऊर्जा प्रकल्पासाठी एकूण ९३८ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात येत असून यापैकी अंदाजे ६९२ हेक्टर जमीन प्रकल्पासाठी व अंदाजे २४८ हेक्टर जमीन वसाहतीसाठी वापरण्यात येणार आहे.

ऊर्जा निर्मितीसाठी औष्णिक, पवन, सौर, जलविद्युत असे विविध स्त्रोत वापरले जातात. तथापि अणुविज आज सर्व जगभर स्वीकारली जात आहे. आजमितीला जगात ४३६ अणुभट्ट्या सुरू असून ५६ अणुभट्ट्याचे काम चालू आहे. अणुऊर्जा खात्याच्या अखत्यारीत असलेला न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा सार्वजनिक क्षेत्रातील भारत सरकारचा उपक्रम सध्य ४३४० मेगावॅट क्षमता असलेल्या १८ अणुभट्ट्या चालवित आहे. जैतापूर येथील अणुभट्ट्यांच्या निर्मितीसाठी भारत-फ्रान्स या दोन देशात करार झाला आहे. प्रकल्पाच्या बांधणीला सुरुवात झाल्यापासून सुरूवातीच्या दोन अणुभट्ट्या पूर्ण होण्यास अंदाजे ६ वर्षाचा कालावधी लागेल. पहिल्या दोन अणुभट्ट्यांचे काम पूर्णत्वाकडे गेल्यावर दुसऱ्या दोन अणुभट्ट्याचे काम सुरू होणार आहे.

या प्रकल्पाबाबत येथील स्थानिक ग्रामस्थांचे वेगवेगळे समज, वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मी स्वतः रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने प्रकल्पस्थळाला नुकतीच भेट देवून ग्रामस्थांचे मनोगत जाणून घेतले. या प्रकल्पामुळे येथील पर्यावरण, फळबाग, मासेमारी यास हानी पोहोचेल असा येथील ग्रामस्थांचा समज आहे. खरं म्हणजे अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि अणुऊर्जा खात्याचे आजी सचिव डॉ. अनिल ककोडकर यांच्यासारखे अणुशास्त्रज्ञ यांनी याबाबतच्या सर्वच शंकांचे निरसन केले आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचणार नसून फळबागा, झाडे यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. मुळात या प्रकल्पामुळे कुणाचेही घर विस्थापित होणार नाही. तथापि प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या आहेत. त्यांना पुनर्वसन पॅकेजद्वारे शासन भरपाई देणार आहे. म्हणून या प्रकल्पाला विरोध करूनही जर हा प्रकल्प होणारच असेलतर ग्रामस्थांनी या प्रकल्पापासून काय फायदा करून घेता येईल ते पाहिले पाहिजे. भरपाईमध्ये आणखी वाढ हवी असल्यास सनदशीर मार्गाने लोकांनी आपले म्हणजे शासनाकडे मांडले पाहिजे. कारण चर्चा हा लोकशाहीचा आत्मा आहे. चर्चेतून आपल्या हिताच्या दृष्टीने मार्ग सापडू शकतात. म्हणून पूर्वग्रहदुषित मते मनात ठेवून विरोध करण्यात काहीच अर्थ नाही. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रगतीला हातभार लागणार आहे.

औद्योगिक प्रगतीही होवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. जैतापूर प्रकल्पामुळे जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना शासन जास्तीत जास्त मदत देणार आहे. समुद्रातील मासे तसेच समुद्री वनस्पती यावर कोणताही परिणाम या प्रकल्पामुळे होण्याची शक्यता नाही. या प्रकल्पाबद्दल लोकांच्या मनात असलेल्या सर्व शंका दूर करण्यात शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोकणातील पिके, मासेमारी, जनजीवन यावर कोणताही विपरीत परिणाम न होता स्वच्छ ऊर्जा देणारा पर्याय स्वीकारून कोकण पर्यायाने देशाच्या विकासात हातभार लावण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.