Tag Archives: मीरा बोरवणकर

माझ्यापेक्षा कॉन्स्टेबलांना हिरो करावे

मीरा बोरवणकर

मीरा बोरवणकर

‘आपल्यापेक्षा पोलिस कॉन्स्टेबल हेच खरे ‘हिरो’ आहेत कारण पोलिस चौकीत लहान-मोठ्या गुन्ह्यांचा तपास करुन ते मोलाची कामगिरी बजावत असतात,’ पुण्याच्या पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी गुरुवारी स्पष्ट भूमिका मांडली.

‘हिरो’ बनून आपल्याला प्रदर्शन करायची इच्छा नाही व यापुढेही राहणार नाही असे त्यांनी स्पष्ट करुन पुढील कार्याबद्दल सांगितले. बुधवारी पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलांचे आदेश जाहीर झाले. येरवड्याच्या तुरुंग महानिरिक्षकपदी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काडण्यात आल्याने बोरवणकर यांची बदली करण्यात आली. त्यांनी या विषयावर गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला.
आपल्या कार्यकाळात तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्प घेण्यात आले. पोलिस चौक्यांचे सक्षमीकरण, स्टडी सर्कल आणि स्टुडंट इंटर्नशिप. त्यांच्या स्थापनेसाठी सहा महिने लागले व सक्षमीकरणात दीड वर्ष गेले. पोलिस अधिकारी नागरिकांना सहज उपलब्ध व्हावेत. व्हीआयपींना पोलिस कॉन्स्टेबल घाबरत असले तरी, नागरिकांना समान वागणूक मिळायला हवी, अशी अपेक्षा बोरवणकर यांनी व्यक्त केली.

‘एका कॉन्स्टेबलला अन्य दोघांची जबाबदारी पेलावी लागत असल्यामुळे त्यांना आठ तास काम करावे लागते. ते जरी मर्यादेपेक्षा अधिक काम करत असले तरी यामुळे त्यांच्या मानसिक, शारीरिक आरोग्यासह त्यांच्या पगाराकडेही लक्ष दिले पाहिजे,’ असेही त्या म्हणाल्या. ‘मोक्का’नुसार आठ संघटनांवर, तर पाच जणांवर घातक प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कारवाईचा बडगा उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘पोलिसांच्या रुपात नागरिकांना ‘सिंघम’ हवाय जो प्रत्यक्षात साकारणे अवघड आहे. जगाला बदलणे आपल्या हातात नाही. पोलिस ठाणे सक्षम करणे एवढेच आपल्या हातात आहे,’ असे म्हणून त्यांनी आपले मत व्यक्त केले.