Tag Archives: मुख्यमंत्री

पहिल्या सुपरस्टारला मुकलो – मुख्यमंत्री

राजेश खन्ना

राजेश खन्ना यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजविणाऱ्या पहिल्या सुपरस्टारला मुकलो आहोत. त्यांच्या निधनाने अभिनयाच्या माध्यमातून तरल भूमिकांचे एक पर्व संपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, “राजेश खन्ना यांनी कोट्यवधी चित्रपट रसिकांच्या हृदयावर राज्य केले. १९९२ मध्ये पोटनिवडणुकीतून नवी दिल्ली मतदार संघातून ते लोकसभेवर निवडून गेले. आपल्या या राजकीय कारकीर्दीत त्यांनी एकही नवीन चित्रपट स्वीकारला नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. माझ्या कराड लोकसभा मतदारसंघात माझ्या प्रचार मोहिमेसाठी ते दोनवेळा आले होते. १९९२ ते ९६ या कालावधीत लोकसभेत सहकारी म्हणून आम्ही एकत्र होतो. १८० हून अधिक चित्रपटात भूमिका केलेल्या खन्ना यांनी बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार हे सर्वोच्च स्थान मिळविले. १०६ चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका अदा केली. हळव्या आणि संवेदनशील नायकाच्या हळुवार भूमिकांसाठी ते नेहमी ओळखले गेले. अत्यंत संयमीत अभिनय आणि संवादांची हळुवार फेक ही त्यांची खासियत होती. संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करणाऱ्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या. प्रत्येक भूमिकेवर त्यांचा स्वत:चा ठसा असायचा. अतिशय कमी कालावधीत सुपरस्टारपद मिळविलेल्या खन्ना यांना पुढील काळात ते पद टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि त्याला ते सामोरे गेले.

१९६७ ते २०१० अशी प्रदीर्घ कारकीर्द असलेल्या राजेश खन्ना यांचे आराधना, सच्चा झुटा, आनंद, कटी पतंग, अंदाज, बावर्ची, हाथी मेरे साथी, आपकी कसम असे एकाहून एक सरस चित्रपट रसिकांच्या कायम स्मरणात रहाणारे आहेत. आनंद चित्रपटातील “बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही” हा संवाद ते अक्षरश: जगले. हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च मानला गेलेल्या फिल्मफेअर पुरस्कारांसाठी १४ वेळा त्यांचे नामांकन झाले. आणि ३ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला.” असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

राजेश खन्ना यांच्या पार्थिवाचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेतले

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुप्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांच्या पार्थिवाचे वांद्रे येथील आशिर्वाद निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुष्पचक्र वाहून बॉलिवूडच्या या महाअभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान, आमदार माणिकराव ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

अभिनयाच्या क्षेत्रातील महापर्वाचा अस्त – अजित पवार

ज्येष्ठ अभिनेते आणि हिन्दी चित्रपटसृष्टीतील पहिले महानायक राजेश खन्ना यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून रसिकांचं अलोट आणि चिरंतन प्रेम लाभलेल्या राजेश खन्ना यांच्या निधनाने अभिनयाच्या क्षेत्रातील एका महापर्वाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, राजेश खन्ना यांनी आपल्या सदाबहार आणि चतुरस्त्र अभिनयानं माझ्यासारख्या कोट्यवधी चित्रपट रसिकांना अक्षरश: मोहिनी घातली होती. ती मोहिनी आजही कायम आहे. आराधना, कटी पतंग, आनंद, बावर्चीसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी केलेल्या अभिनयांनं रसिकांना प्रचंड आनंद दिला. ते खऱ्या अर्थानं ‘आनंद’ यात्री होते. हिन्दी चित्रपटसृष्टीत पहिला महानायक होण्याचा मान त्यांनी मिळवला आणि आपली ती लोकप्रियता त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवली, हे त्यांच्यातल्या उत्कृष्ट अभिनेत्याचं आणि सहृदय व्यक्तिमत्वाचं प्रतिक आहे. त्यांच्यासारखा अभिनेता आणि माणूस पुन्हा होणार नाही.

भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार हरपला – छगन भुजबळ

अभिनेते राजेश खन्ना यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका सुपरस्टारमय ‘स्टाईल’ युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

श्री.भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, १९६० आणि १९७० च्या दशकात राजेश खन्ना यांनी भारतीय, विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीवर एकहाती अधिराज्य गाजवले. अभिनयाची अनोखी शैली आणि विशिष्ट ‘राजेश खन्ना स्टाइल’ अदाकारीने त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. राजेश खन्ना यांचे चाहते, विशेषतः तरुणींमध्ये असलेली त्यांची कमालीची लोकप्रियता यांचे अनेक किस्से आणि आख्यायिका त्या काळातही चर्चिले गेले आणि आजही सांगितले जातात. चेतन आनंद यांच्या ‘आखरी खत’ या चित्रपटातून पदार्पण केलेल्या राजेश खन्ना यांनी त्यानंतर राझ, बहारों के सपने, औरत, इत्तेफाक, आनंद, आराधना, आप की कसम, रोटी, प्रेम कहानी, अंदाज, कटी पतंग, अमर प्रेम, नमक हराम, अजनबी, कुदरत, सौतन असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. किशोर कुमार यांचं पार्श्वगायन आणि पडद्यावर राजेश खन्ना हे समीकरण इतकं जुळून गेलं होतं की, त्यांना वेगळं करणं अशक्य होतं. या दोघांनी कित्येक सुपरहिट गाणी दिली ती आजही चिरस्मरणीय आहेत. खासदार म्हणून त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रोमँटिझमचं युग आणणारा पहिला सुपरस्टार म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

चित्रपटसृष्टीतील पहिला महानायक काळाच्या पडद्याआड – जयंत पाटील

ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील पहिला महानायक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात मुंबई शहराचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

आराधना‘, ‘कटीपतंग’, ‘अमर प्रेम‘, ‘आनंद‘ यासारख्या कितीतरी चित्रपटांच्या माध्यमातून राजेश खन्ना यांनी आपल्या अभियानाचा अमिट ठसा केवळ त्यांच्या पिढीतील प्रेक्षकांवर उमटविला असे नाही तर त्यांच्या अभिनयाचे गारुड आजच्या नव्या पिढीवर देखील पहावयास मिळते.

सांगली-इस्लामपूर येथील नाट्यगृहाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. या भेटी दरम्यान उत्कृष्ट कलांबरोबरच त्यांच्यातील एक उमदे व्यक्तिमत्व अनुभवायास मिळाले, असेही श्री.पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार काळाच्या पडद्याआड – संजय देवतळे

सुप्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांच्या निधनाबद्दल अतीव शोक व्यक्त करुन सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे म्हणाले, बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

श्री.देवतळे म्हणाले, मूळचा गिरगावकर असलेल्या या अभिनेत्याची चित्रपट कारकीर्द आराधना या सुपरहिट चित्रपटानंतर बहरतच गेली. शर्मिला टागोर, मुमताज, आशा पारेख या अभिनेत्रींबरोबर त्यांची चांगली जोडी जमली. आनंद या चित्रपटात त्यांनी साकार केलेली कॅन्सरग्रस्त रुग्णाची भूमिका आजही सर्वांच्या मनात घर करुन आहे. या चित्रपटात बाबू मोशाय ही त्यांनी अमिताभ बच्चन यांना घातलेली साद निव्वळ अविस्मरणीय आहे. सफर, अमर प्रेम, दुश्मन, आविष्कार, कटीपतंग अशा त्यांच्या एकाहून एक सुंदर आणि भावपूर्ण चित्रपटांची यादी न संपणारी आहे.

गुरू शर्ट हा त्यांनी लोकप्रिय केलेला पोशाख आजच्या जीन्सच्या जमान्यातही टिकून आहे. हाताची विशिष्ट मुद्रा आणि मान तिरकी करुन केलेल्या संवाद फेकीमुळे ते लाखो तरुणींच्या हृदयांची धडकन झाले होते. अवतार या वृद्ध दाम्पत्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाने अनेकांना हेलावून टाकले. राजेश खन्ना यांच्या चित्रपट कारकीर्दीसाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन २००३ मध्ये त्यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

सत्तरच्या दशकातील हा भावस्पर्शी अभिनेता आज आपल्याला सोडून गेला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.