Tag Archives: मोर

गणपती मयुरेश्वर झाला

गणपती मयुरेश्वर झाला

गणपती मयुरेश्वर झाला

एकदा शेष वासुकी परिवारासह पाताळामध्ये बसला असता सर्व सर्पाची माता कटू तेथे आली आणि आपल्या पुत्रांना म्हणाली, ‘तुमची सावत्र माता विनता हिच्या भेटीस मी गेले असता तिने दुर्भाषणे करुन माझा अपमान केला. त्यामुळे मला मरणप्राय यातना झाल्या. जर तुम्ही खरोखरच पराक्रमी असाल तर तिच्यावर सूड उगवा अन्यथा मला जीव देण्यावाचून गत्यंतर नाही.’

मातेचे हे भाषण ऐकून शेषाला राग आला. त्याने वासुकीला सैन्यासह विनतेच्या बांधून शेषापाशी आणिले. तेव्हा विनतेने आपला पुत्र गरुढाचे स्मरण केले. गरुडाचे स्मरण करताच गरुड श्येन, संपत्ती, जटायू या आपल्या बंधूसह मातेच्या साहाय्यार्थ सर्पाबरोबर लढण्यासाठी आले. पण त्याचा सर्पानी पराभव केला. तेव्हा गरुडाने सूक्ष्म रुप धारण केले आणि विनतेला घेऊन कश्यपाच्या आश्रमात पळून आला.

आश्रमात आल्यावर विनतेने आपला पती कश्यप याला हे सर्व वर्तमान कथन केले. तेव्हा कश्यप विनतेस म्हणाला. ‘भिऊ नका! तुला पुनः गर्भ प्राप्त होईल. त्यावेळी एक अंडे तुला प्राप्त होईल. ते जेव्हा गजानन फोडील, तेव्हा त्यातून उत्पन्न होणाऱ्या पक्षाच्या केवळ शब्दानेच सर्पाचा पराभव होईल! हा पक्षी गजाननाचे वाहन होईल.

हे ऐकून विनतेला आनंद झाला. कालांतराने विनतला गर्भ राहून तिने एक अंडे घातले. ते मातीमध्ये सुरक्षित ठेवले.

पुढे एक दिवस विनता आपले अंडे उबवीत व त्याचे रक्षण करीत बसली असता गणपती एका दैत्याचा पाठलाग करीत तेथे आला. त्या दैत्याला आपल्या पाशाने मारल्यावर विनतेचा डोळा चुकवून त्याने ते अंडे फोडले. त्याबरोबर त्यातून एक प्रचंड पक्षी (मोर) बाहेर आला आणि तो गणपतीशी युद्ध करू लागला. त्यावेळी गणपतीने आपली चारही आयुधे त्याच्यावर सोडली, तरी त्यांना न जुमानता त्या पक्षाने आकाशात उड्डाण करून गणपतीवर झेप घातली. तोच गणपती चपळाईने झेप घेऊन त्या पक्षाच्या पाठीवर बसला. एव्हा विनतेला पूर्वी झालेला कश्यपऋषीबरोबरचा संवाद आठवला. तिने गणपतीला ओळखले व म्हणाली, ‘देवाधिदेवा, ज्याअर्थी तू हे अंडे फोडलेस, त्याअर्थी हा पक्षी तुझे वाहन होईल. सर्पाचा संहार करून हा पक्षी माझ्या पुत्रांना शेषाच्या बंदीवासातून मुक्त करील, असे माझ्या पतीचे भविष्य आहे. तेव्हा हे गणेशा, तू याला साह्य करुन कार्य सिद्धीस ने आणि याच्या नामासह तुझा उच्चर लोकांनी करावा, असा याला वर दे’

विनतेच्या इच्छेप्रमाणे गणपतीने तिला वर दिले आणि यापुढे विनतेचा बालक ‘मयुरेश्वर’ या नावाने ओळखला जईल असा वर दिला. तेव्हापासून मोर गणपतीचा वाहन झाला. मग गणेशाने मयुरावर बसून पाताळात जाऊन विनतापुत्रांची शेषाच्या बंदीवासातून मुक्तता केली. याच मोरावर बसून गणपतीने सिंदुराचा पराभव केला व आपल्या ‘मयुरेश्वर’ अवताराची समाप्ती करताना आपला बंधू कार्तिकेयास आपले वाहन मोर देऊन त्याचेही नाव मयुरेश्वर असे ठेवले.