Tag Archives: रंगपंचमी

रंगपंचमी

रंगपंचमी

रंगपंचमी

होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे रंगपंचमी.

रंगपंचमी हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात. नाना विविध रंगाची उधळण करायची आणि एका आगळ्या वेगळ्याच स्वानंदाच्या रंगांत रंगून जायचे हे साधायच असत ह्या सणाच्या साजरेपणात.

रंग… खरंच प्रत्येक रंगाला एक अर्थ असतो. प्रत्येक रंगाची एक शिकवण असते. पांढरा रंग शांततेचा, लाल रंग त्यागाचा, हिरवा रंग समृद्धीचा, रंगांच्यामुळेच आपले जीवन हे सुद्धा रंगीन होते. गोकुळांत श्रीकृष्णाबरोबर गोप-गोपिकांनी जी रंगपंचमी साजरी केली. त्या रंगपंचमीला होता एक रंग भक्तीचा. आपल्या स्वातंत्र्य वीरांनी, क्रांतीकारकांनी, देश भक्तांनी स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपल्या रक्ताची जी रंगपंचमी केली तिचा रंग होता त्यागाचा समर्पणाचा. सुर्यास्ताला आकाशांत नानाविध रंगाची उधळण रविराज करतो ती आकाशीची रंगपंचमी आपलं मन मोहून घेते.

आकाशाचा निळा रंग, शेत शिवाराचा हिरवा रंग, खळखळणाऱ्या पाण्याचा पांढरा रंग, फांदीवर फुलणाऱ्या रंगीबेरंगी फुलाचे रंग, फुलाभोवती गुंजन करणाऱ्या भुंग्याचे रंग, बागेत बागडणाऱ्या चिमुकल्या फुलपाखरांचे रंग….. आपल्या अवती भवती ही रंगाची रंगपंचमी नेहमीच फुलत असते. आपले मनं मोहित असते.

मानवी जीवनांत जर प्रेम नसेल, आस्था जिव्हाळा नसेल तर जगणं ही रंगतदार होत नाही. रंगपंचमीच्या सण, त्यातले रंग हे आपल्याला बरचं काही सांगून शिकवून जातात. त्या रंगांनी आपण आपलं जीवन चित्र रंगवून घ्यायचं असतं. रंगाची दुनिया जीवनाला जगण्याला एक नवा अर्थ देते.

रंगपंचमी खेळताना, दुसऱ्याला रंग लावत असताना आपल्या त्या कृतीने समोरची व्यक्ती सुखावेल. त्याला आनंद होईल हेच पहायला हवे. नैसर्गिक रंग खेळायला हवेत. नवे बाजारी रासायनिक रंग खेळणे धोकादायक आहेत हे समजून घ्यायला हवं. रासायनिक रंगामुळे डोळे चूरचूरतात. त्वचेची आग होते. कातडी खराब होते. तेव्हा असे रंग न वापरणे हेच योग्य नाही कां?

आपण प्रत्येकानेच आपले आवडते छंद, कला, नैपुण्य इ. अप्रतिम रंग भरून आपलं जीवन हे रंगदार बनवायला हवं हाच रंगपंचमी ह्या सणामागचा संदेश आहे. भक्तीचा रंग, प्रेमाचा रंग, त्यागाचा रंग एकत्वाचा रंग हे सारे रंग आपणच आपल्या जीवनांत भरून घ्यायला हवेत. रंगपंचमीला वैरभाव आकस दूर करणारा बेरंगी जीवनाला रंगीन बनवणारा असा आहे.
पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाये वैसा बने उस जैसा
ह्या उक्तीप्रमाणे जीवनांत रंग भरून ते अधिक मोहक करण्यातच खरा आनंद आहे.