Tag Archives: रसीक

क्या बात है

अकबर बादशहा हा संगीताचा नुसता शौकीनच नव्हता, तर जाणकारही होता, आपल्या आश्रयाला असलेल्या तानसेनच्या गाण्याच्या मैफ़लीत तर तो आपलं बादशहापण विसरुन जायचा, आणि गाता गाता तानसेननं एखादी बहारदार तान घेतली, की ‘क्या बात है /’ ‘बहोत अच्छा !’ असे आनंदाचे उदगार काढून, तो त्याला दादही द्यायचा.पण व्हायला काय लागल ?

बादशहा ‘क्या बात है!’ असं म्हणाला रे म्हणाला, की इतर सरदारही ‘क्या बात है !’ असे उदगार काढायचे !

बादशहा ‘बहोत अच्छा !’ म्हणाला, की इतर सरदारही त्याना कळो वा न कळो – ‘बहोत अच्छा ! म्हणून कोकलायचे !

या दाद देणाऱ्यांमध्ये खरे कोणते व बाजारबुणागे कोणते, हे तानसेनला कळेना, एकदा ते बादशहाला म्हणाला, ‘जहॉंपन्हा, माझ्या मैफ़लीला गर्दीपेक्षा दर्दी मिळाल्यानेच मला आनंद होईल. मग माणसं अगदी मोजकी असली तरी हरकत नाही.’

बादशहाला तानसेनचे म्हणने योग्य वाटले. पण ‘तानसेनच्या गाण्यातल मर्म त्याला दाद देणारे कोण आणि आपण त्याला दाद देताच आपल्या पाठोपाठ केवळ कर्तव्यापोटी त्याच्यावर ‘क्या बात है ? व ‘बहोत अच्छा!’ यांची दिखाऊ उधळण करणारे कोण, हे ओळखायचं कसं?’ असा बादशहापुढं पेच पडला. सुदैवान त्याच वेळी बिरबल तिथे आला. बादशहान तानसेनच म्हणणं त्याच्या कानी घातलं आणि क्षणार्धात बिरबलनं, हा प्रश्न कसा सोडवायचा याची युक्ती बादशहाच्या कानात सांगितली. आठवड्याभरानंतरच्या ज्या रात्री तानसेनची मैफ़ल होणार होती, त्याच दिवशी बादशहानं फ़र्मान काढलं, ‘आज रात्री गानसम्राट तानसेन याच्य मैफ़िलाला येणाऱ्यांना, तानसेन यांचं गाणं चालू असताना मध्येच ‘क्या बात है ! बहोत अच्छा !’ अशांसारखे प्रशंसोदगार काढण्याची सख्त मनाई आहे. या हुकुमाचा भंग करणाऱ्याची तिथल्या तिथे ग ‘न छाटली जाईल.’

ते शाही फ़र्मान वाचून, मैफ़लीला जाणाऱ्यांपैकी बहुतेक लोक स्वत:शीच म्हणाले, ‘आपल्याला कुठे आहे त्या गाण्याची गोडी? खाविंद जातात म्हणून जिवाच्यावर जावे लागते, आणि ते दाद देतात, तेव्हा कर्तव्यापोटी आपल्यालाही तशी दाद द्यावी लागते. ठीक आहे. खाविंद जाणार म्हणून आजही आपण मैफ़लीला जाऊ, पण चूपचाप बसून राहू.’ फ़क्त ते फ़र्मान वाचून चिंता पडली, ती अगदी मोजक्या मार्मिक रसिकांना !

रात्री मैफ़लीच्या महालात नित्याची श्रोतेमंडळी शिरु लागली. बघतात, तर प्रत्येक गादी -लोडाच्या बैठकीमागे नंगी समशेर हाती घेतलेला एकेक हशम उभा ! काही श्रोते खरोखरच घाबरले, पण बरेचसे मनात म्हणाले,’गाणं चालू असताना, शब्दांनी दाद देणे तर दूरच राहिले, पण आपण साधीमानही हलवायची नाही; मग हशम आपली मान कशाला उडवील ?’

मैफ़ल सुरु झाली; तिला रंग चढू लागला, आणि राग आळवता आळवता थोड्याच वेळात तानसेनन अशी एक बिजलीसारखी तळपती तान घेतली, की समोर बसलेल्या दोन-अडीचशे श्रोत्यांपैकी पंधरा-वीसजणांनी मागे उभ्या असलेल्या हशमांच्या हातांतील नंग्या समशेरींची दखल न घेता उत्स्फ़ूर्त दाद दिली. ‘वाहवा ! क्या बात है ! बहोत अच्छा !’ बाकीचे अरसिक नग मात्र चिडीचिप बसून राहिले.त्या जाणकारांनी दाद दिली, तरी डोके कुणाचेच उडविले गेले नाही, पण जवळ जवळ तेच तलवारीचे काम शब्दांनी करायला बिरबल उभा राहिला. बादशहाला उद्देशून तो म्हणाला, ‘खाविंद! पाठीमागे जीव घ्यायला नंगी तलवार सज्ज असतानाही ज्यांनी बेभान होऊन, तानसेनजीच्या आत्ताच्या ताणेला दाद दिली, त्या दर्दी रसिकांनाच यापुढं मैफ़िलीत येऊ द्यावं, बाकीच्या सर्वांना या मैफ़िलीच्या महालाचे दरवाजे बंद ठेवावेत.’