Tag Archives: राजधानी

पावसाची एवढी गंभीर स्थिती नाही

शरद पवार

शरद पवार

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत चांगला पाऊस होऊन पीकपाणी उत्तम होईल. त्यांनी असे सांगून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक देशवासीयांना दिलासा दिला आहे. राजधानीत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, ‘पीकपाण्याची स्थिती एवढी चिंताजनक नाही. उशिरा पावसाचा झटका भातपीकालाही बसणार नाही. पावसाने जरी आपल्याला खूप दिवस वाट बघायला लावली तरी, तरी येत्या एक-दोन आठवड्यांत चांगला पाऊस पडेल, अनुशेष भरुन काढेल.’

पवार देशभरातील शिवाराची माहिती देताना म्हणाले, ‘पावसाचे प्रमाण ३१ टक्क्याने कमी झाले. ज्वारी, बाजरी, मका अशा पिकांच्या पेरण्यांना त्याचा फटका बसला आहे. मात्र, खरिपातील मह्त्त्वाचे पीक, भातपीकाच्या उत्पादनावर फारशी प्रतिकूल परिस्थिती येणार नाही. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि बिहार-उत्तरप्रदेशाच्या काही भागांत पेरण्या लांबल्या आहेत. पश्चिम आणि मध्य भारतात उशिरा पाऊस झाल्यामुळे काळजीचे वातावरण आहे. मात्र, एवढी गंभीर स्थिती आलेली नाही.’

‘भाताची पेरणी नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात झाली आहे. भात उत्पादक राज्यांत म्हणजे पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये अधिक उत्पादन होण्याची शक्यता आहे,’ असे भातसंदर्भात पवार म्हणाले.