Tag Archives: राजेंद्र कानडे

झेंड्याची शान तीच देशाची शान

मुंबई मंत्रालय

मुंबई मंत्रालय

मंत्रालयाला आग लागल्याचे वृत्त समजताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तेथील परिस्थिती जीवघेणी असूनही मंत्रलयातील सात कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या गच्चीवर धाव घेतली आणि आपल्या देशाच्या तिरंग्याचे रक्षण केले. ‘झेंड्याची शान, तीच देशाची शान… त्यापुढे जीवाचे मोल ते काय!’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राजेंद्र कानडे, पंडित केंदळे, सुरेंद्र जाधव, गणेश मुंज, दीपक अडसूळ, सुरेश बारिया आणि विशाल राणे हे सगळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत काम करतात व नेहमीप्रमाणे गुरुवारी त्यांची ‘ड्यूटी’ सुरु झाली. सूर्योदय झाल्यानंतर त्यांनी मंत्रालयाच्या इमारतीवरचा तिरंगा फडकविला. पण अचानक आगीने इमारतीला वेढले आणि त्यांच्या मनांत धोक्याची घंटा वाजू लागली. आग लागण्याच्या वेळेस ते सातही जण वर ड्यूटी करीत होते.

“आग लागल्यानंतर खाली लोकांचा घोळका पाहिल्यावर ही घटना गंभीर असल्याची आम्हाला जाणीव झाली. तिरंग्याकडे आम्ही अधून-मधून पहात होतो. इतक्यात, आगीने प्रलयाचे रुप धारण केले. तिरंग्याच्या दिशेने थेट धुराचे आणि आगीचे लोळ यायला लागले. तिरंग्याला कुठलाही धोका न पोहोचता त्याचा मान राखला जावा असे सतत वाटत होते. जेव्हा आगीच्या ज्वाळा वाढू लागल्या तेव्हा मात्र आमचा जीव कासावीस होऊ लागला. आम्हाला कशाचेही भय वाटत नव्हते पण आम्हाला तिरंग्याची काळजी वाटत होती. जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नव्हतो. शेवटी आदेश आल्यावर आम्ही तिरंग्याला सुखरुप खाली उतरवला. शिडीने त्यानंतर आम्ही खाली आलो…” असे समाधाने हे सातही वीर सांगत होते.