Tag Archives: रानगाढव

गाढव आणि रानगाढव

एका मनुष्याचा एक धष्टपुष्ट गाढव एका कुरणांत मौजेने चरत होता. इतक्यांत एक रानगाढव तेथे आला आणि त्यास म्हणाला, ‘दादा, तुझी स्थिती फार स्पृहणीय आहे, यांत शंका नाही.’ इतके बोलून तो रानांत निघून गेला. पुढे एके दिवशी त्या कुरणांतल्या गाढवाच्या धन्याने त्याच्या पाठीवर एक भले ओझे लादले व तो चालेना म्हणून तो त्यास चाबकाने मारू लागला. इतक्यांत तो रानगाढव तेथे येऊन पहिल्या घाढवास हळूच म्हणतो, ‘गडया तुझी स्थिती जितकी चांगली आहे असे मला वाटले होते, तितकी चांगली ती दिसत नाही, हे आता माझ्या लक्ष्यात आले. सोने चांगले खरे, पण त्यास किंमत फार पडते. असली ओझी वाहून आणि इतका मार खाऊन थोडेसे सुख मिळवावयाचे ही गोष्ट मला बिलकुल पसंत नाही.’

तात्पर्य:- गुलामगिरीतल्या सुखापेक्षा स्वतंत्रतेतले दुःखही चांगले.