Tag Archives: राष्ट्रवादी

मुळशी हिल स्टेशनला गुजरातचे संबंध

मुळशी

मुळशी

‘महाराष्ट्र व्हॅली व्ह्यू’ या कंपनीने मुळशी येथे खासगी हिल स्टेशन उभारण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. मंत्रालय मंडळात ही कंपनी दिल्लीतील कॉंग्रेस मधल्या सर्वोच्च वर्तुळातील मोठा नेता आणि शेजारच्या राज्याच्या ‘विकासाभिमुख मंत्री’ यांची असल्याची दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी हिल स्टेशनसाठी परवानगी दिल्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांना आश्चर्य वाटत आहे.

कोणीही या हिल स्टेशनबाबत निर्णय घेण्यात इतका धाडसी नाही. कोणतेही वादग्रस्त निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण घेत नाहीत. राजकारणात त्यांनी आपली प्रतिमा आतापर्यंत स्वच्छ ठेवली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मंडळी त्यांच्या या ‘धाडसी’ निर्णयामुळे अचंबित झाली आहेत. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी सांगत होते की, मुख्यमंत्र्यांपर्यंत वादग्रस्त फायली पोहोचत नाहीत आणि अचानक हा हिल स्टेशन उभारण्याचा निर्णय कसा घेतला गेला, असे बोलले जात आहे.

गुजरात येथील वापीमधील बड्या उद्योगसमूहाला हे हिल स्टेशन उभारण्यात मोठा रस असल्याचे दिसून येते. मोठ्या प्रमाणात त्यांनी या भागातल्या जागा खरेदी केल्या आहेत. असे बोलले जात आहे की, दिल्लीतील कॉंग्रेसमधील एक बडा नेता (जो गुजरातचा आहे) त्याचे आणि शेजारच्या राज्यातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहेत व या गोष्टीचा फायदा ‘महाराष्ट्र व्हॅली व्ह्यू’ कंपनीला झाला असल्याची चर्चा आहे.