
विनोबा भावे
जन्म : ११ सप्टेंबर १८९५
मृत्यू : १५ नोव्हेंबर १९८२
विनायक नरहरी भावे (विनोबा भावे) ह्यांचा जन्म ११ सप्टेंबर,१८९५ रोजी, गागोडे गाव, कुलाबा जिल्हा, महाराष्ट्र येथे एका धार्मिक कुटुंबात झाला. त्यांचे बालपण बडोदा येथे गेले. त्यांच्यावर लहानपणी भगवद्गीता, महाभारत, रामायण यांचा प्रभाव पडला. त्यांचे वडील नरहरी शंभूदास भावे आणि आई रघुमाईदेवी यांनी त्यांची मानसिक वृत्ती घडवली. त्यांच्या आठवणींमध्ये भावे म्हणतात “माझ्या मनाला आकार देण्यात आईएवढी दुसऱ्या कशाचीही भूमिका नाही.” १९२१ मध्ये वर्धा येथे सत्याग्रह आश्रमाची एक शाखा निघाली, तेव्हा तिचे नेतृत्व गांधीजींनी विनोबावर सोपवले होते. व्यासंग आणि आचार शुद्धता यामुळे विनोबांना ‘आचार्य’ ही पदवी देण्यात आली. गांधीकुलाचे ते आचार्य होते. विनोबा हे गांधीजींचे अध्यामिक वारसदार होते.
हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४० मध्ये ‘वैयक्तिक सत्याग्रह’ पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२मध्ये ‘छोडो भारत’ आंदोलनात झाले. पुढे ते सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींसोबत होते. स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सन १९३२मध्ये त्यांना तुरुंगवास घडला.
ते समाज नेतृत्वासाठी दिल्या गेलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले मानकरी होत. त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.