Tag Archives: लालबागचा राजा

उंचीपेक्षा भक्तिभाव श्रेष्ठ समजावा

गणेशाची उंच मूर्ती

गणेशाची उंच मूर्ती

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांनी सवाल केला की, ‘आपण परंपरेच्या नावाखाली अजून किती काळ चुकीचा पायंडा पाडणार आहोत? गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने घालायलाच हवीत’. लालबागचा राजा, गौड सारस्वत ब्राह्मण आणि अंधेरीचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आवाहन केले आहे की, भक्तीभाव हे मूर्तीच्या उंचीपेक्षा श्रेष्ठ समजले पाहिजे.

‘गेल्या ४७ वर्षांपासून आम्ही गणपतीच्या मूर्तीची उंची साडेआठ फूट ठेवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. आगमनापासून ते विसर्जनापर्यंत मोठ्या मूर्ती खूप सांभाळाव्या लागतात. मोठे उड्डाणपूल, झाडे वैगरे रस्त्यावर असतात. विसर्जनाच्या वेळेस मोठ्या मूर्ती सांभाळायला कार्यकर्त्यांना खूप मोठी कसोटी करावी लागते. मंडळांनी वैद्यकीय शिबिरे, विद्यार्थ्यांना मदत असे विविध कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. उगीचच मूर्तीच्या स्पर्धेत पडून रंगाचा बेरंग करु नये,’ अंधेरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रवक्ते राजू सालियान यांनी हे मत दिले.

यावेळेस लालबागचा राजा मंडळाचे ७९ वे वर्ष आहे व यंदाही १२ फूट उंचीची त्यांची मूर्ती कायम आहे. मंडळाचे कोषाध्यक्ष राजू लांजवळ यांनी सांगितले की, लालबागचा राजा मंडळ कधीही उंचीच्या स्पर्धेत उतरलेले नाही. समन्वय समितीने घेतलेला उंचीबाबत निर्णय योग्यच आहे.’

लांजवळ यांनी स्पष्ट केले की, पावित्र्य, मांगल्याची परंपरा गणेशोत्सवाला आहे. आपण हा उत्सव दहा दिवस भक्तिभावाने साजरा करतो. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीचे दृष्य खूप विचित्र असते. मूर्तीच्या उंचीपेक्षा भक्तिभाव अधिक मोठा असावा.