Tag Archives: वडिल

वडिलांची परंपरा

थॉमस मूर हा इंग्लिश कवी एका गरीब कुटुंबातून वर आला होता. तो किर्तीच्या शिखरावर असताना, त्याला श्रीमंत लॉर्डच्या एका मंडळात काव्यगायनासाठी आमंत्रण दिलं गेलं.

एक अहंकारी लॉर्ड त्याला आमंत्रण देण्याच्या विरुध्द होता, पण बहुसंख्य लॉर्डच्या इच्छेपुढे त्याला नमतं घ्यावं लागल होतं, तरीसुध्दा त्याच्या पोटातली मळमळ त्याला स्वस्थ बसू देईना.

अखेर कवीवर्य थॉमस मूर हा लॉर्डच्या मंडळात येताच, पोटात मळमळत असलेल्या त्या लॉर्डनं त्याला खवचटपणे विचारलं, ‘काय श्रीयूत मूर, तुमचे वडील एक साधं किराणा मालाचं दुकान चालवित होते; मग तुम्ही सुध्दा या काव्याच्या प्रांतात प्रवेश करण्याऎवजी तुमच्या वडिलांचीच परंपरा पुढे का नाही चालवलीत?’

यावर क्षणही न दवडता थॉमस मूर म्हणाला, ‘वडिलांची परंपरा पुढं चालू ठेवणं सगळ्यानांच कुठं जमतं ? आता तुमचच पाहा ना ? तुमचे वडील एक सज्जन गृहस्थ म्हणून प्रसिध्द होते, पण तुम्ही काही त्यांची परंपरा पूढं चालवू शकला नाहीत.’

कवी थॉमस मूरने सर्वांसमक्ष दिलेल्या या उत्तरामुळं तो घमेंडीखोर लॉर्ड पुरता ढेपाळून गेला.