Tag Archives: साहित्यिक

तर इथे मात्र नक्कीच शिमगा होईल

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

“आता विश्वात्मके देवे” असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं खर, त्याचा गर्भितार्थ समजून घेण्याची गरज पर्यटनप्रेमी साहित्यिकांना भासू लागलेली आहे. अशी स्पष्ट जाणीव-वजा खात्री झाली आहे ती आम्हा मराठी साहित्य प्रेमींची, कारण आहे ते नेहमीचच विश्व साहित्य संमेलनाचा गोंधळ.  मराठी भाषेचा झेंडा अटकेपार रोवण्यासाठी, मराठी साहित्य अधिक सुजलाम-सुफलाम करण्यासाठी, साहित्यिकांचा  (निदान स्वत:च्या  विचारांची १००-२०० पानं  भरणारे) विचाराचे आदान प्रदान व्हावे यासाठी आणि मराठी साहित्याचा प्रसार व्हाव या आणि इत्यादी मुलतः हेतूतून अशा संमेलनाचे आयोजन होते. पण हि सर्व संमेलन आपला मूळ हेतूला विसरून, पेपरच्या  रकाण्यात  गाजतात. ती माना-अपमाना  वरून होणार्‍या भांडणामुळे , मिळालेल्या अनुदानात कार्यकारणीने केलेल्या झोल-झपाटा मुळे किवा उरल्यास सरकारने दिलेल्या कमी अनुदानाचे पाढे गिरवून. मूळ हेतूपासून वंचित संमेलना पासून महाराष्ट्राचा सांस्कुतिक वारसात काय दिवा लागणार आहे हे अशा संमेलनांना अनुदान देणारा सरकारी खजीनदारच जाणो? असो पण साहित्यिक हा त्या भाषेचा, पर्यायानं त्या समाजाचा प्रतिनिधिक आरसा असतो हे भान आजच्या साहित्यिकांनी  बाळगायला हवं.

मराठी साहित्य विख्यात आणि समृद्धच आहे आणि हे साहित्य समृद्ध करणाऱ्या साहित्यिकांनी आपल्या  मातीशी असलेली नाळ तोडलेली नाही. गेले काही दिवस महाराष्ट्र  भीषण परिस्थितीला  तोंड देतोय, दुष्काळाने  शेतकरी व्याकूळ आहे. अशा पिडीत शेतकऱ्यांना सरकार कडून देण्यात येणारे अनुदान तोकडे आहे आणि अशा परिस्थितीत  राना-फुलांवर कविता करणारे निसर्ग कवी सरकारी पैशावर परदेस गमनाचे स्वप्न उरी बाळगतात कसे? हा खर तर त्या निसर्ग कवींचा कवितेलाच पडलेला प्रश्न असेल. विश्व साहित्य संमेलनाच्या कार्यकारणीने मुख्यमंत्र्याकडे  ५० लाखाची मागणी केली होती त्यातले २५ लाख त्यांच्या गळाला लागलेत खरे पण तेवढे देखील परदेशी संमेलन करावयास अपुरे पडत आहेत.

ह्या विश्व साहित्य संमेलनाच्या म्होरक्यांनी एकत्र बसून मराठीच्या उत्क्रांतीसाठी आपल्या मातृभूमीतच काय करता येईल याकडे लक्ष द्यायला हवं. मराठी शाळांचा प्रश्न अगदी ताजाच आहे. इच्छा असून देखील मराठी मुलांना मराठीतून शिकता येत नाही. महाराष्ट्रातील सरास सर्वच मुख्य शहरात मराठीला दुय्यम लेखण्याचा क्रूरपणा स्पष्ट पणे चालू आहे.  मराठीचे संस्कार महाराष्ट्राच्या  मातीत कश्या  प्रकारे रुजवावे याकडे आज प्रकर्षाने लक्ष  द्यायची गरज आहे. या सर्वासाठी माझ्या प्रिय पर-देश प्रिय साहित्यिकांनो आज साहित्य संमेलने आणि मराठी भाषा प्रबोधन सत्रे महाराष्ट्रात भरण खूप गरजेच आहे. नाहीतर परदेशी साहित्य संमेलने करून एका घटके पुरते मराठीचे प्रबोधन इंग्लंड- अमेरिकेत होईल देखील पण त्याचा दूरगामी परिणाम महाराष्ट्रात होणं मुश्कील आहे. आणि अशी  विश्व साहित्य संमेलने परदेशी करून तिथे जर दिवाळी करत राहिलो तर इथे मात्र नक्कीच शिमगा (होळी) होईल.