तांदळाची खांडवी

साहित्य :

  • २ वाट्या तांदळाचा रवा
  • २ वाट्या चांगला गूळ
  • अर्धा चमचा मीठ
  • १ वाटी ओले खोबरे
  • १ इंच आल्याचा तुकडा

कृती :

तांदळाची खांडवी

तांदळाची खांडवी

साधे तांदूळ जरासे भाजावे. नंतर धुवून सावलीत वाळवावे व त्याचा जाडसर रवा काढावा.

जाड बुडाच्या पातेल्यात चार वाट्या पाणी घेऊन चुलीवर ठेवावे. त्यात वाटलेले आले, बारीक चिरलेला गुळ व मीठ घालून ढवळावे. अर्धी वाटी ओले खोबरे घालावे. उकळी फुटली की पाण्यात रवा घालून ढवळावा व झांकण ठेवावे.

वाफ येऊन मिश्रण शिजते व घट्टसर होते. रव्याची कणी दाबून पहावी किंवा खाऊन पाहावी. शिजलेला असला की खाली उतरवावे.

एका ताटाला किंवा ट्रेला तुपाचा हात फिरवावा व त्यात मिश्रण ओतावे. डावाने किंवा वाटीने सारखे करावे. जरा निवाल्यानंतर उरलेले अर्धी वाटी ओले खोबरे त्यावर थापावे. गार झाल्यानंतर वड्या कपाव्या.