तांदुळाची खीर – प्रकार दुसरा

साहित्य :

  • १ लिटर दुध
  • अर्धी वाटी तांदूळ
  • अर्धा डबा कंडेन्स्ड मिल्क
  • २-३ चिमट्या केशर
  • ३ चमचे काजू/बदामाचे कप
  • पाव वाटी साखर

कृती :

तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे. केशर गरम करून चुरडावे व ४ चमचे दुधात भिजत घालावे. जाड बुडाच्या पातेल्यात दूध तापत ठेवावे. उकळायला लागले की त्यात तांदूळ घालावे. तांदूळ शिजेपर्यंत आंच मध्यम ठेवावी व अधूनमधून ढवळत राहावे. तांदळाचा दाणा शिजला ( बोटानेशीत दाबून पहावे ) व मऊ झाला की कंडेन्स्ड मिल्क त्यात मिसळावे व आवश्यक वाटल्यास साखर घालावी. बदाम अगोदर तासभर पाण्यात भिजवावेत किंवा उकळून साल काढून पातळ काप करावेत. काजूचे पातळ काप अडकित्त्याने करता येतात. काजू, बदाम खिरीत घालून एक उकळी आली की केशर मिसळावे व खीरही खाली उतरवावी. वेलचीपूड किंवा जायफळ घालावे. ही खीर निवाली की गार करून खावी.

महाराष्ट्रात तांदुळाची खीर फक्त श्राद्धपक्षाला करतात. पण दक्षिणेत ती शुभप्रसंगी करतात. उत्तरेत किंवा गुजरातेतही (दूधपाक) ही खीर आवडते.

आवडीनुसार यात चिकू, संत्रे बारीक चिरून थंडगार खिरीत बदल म्हणून घालावा चारोळ्याही असल्यास वापराव्या.