ते दूध तुझ्या त्या घटातले

ते दूध तुझ्या त्या घटातले
कां अधिक गोड लागे न कळे ॥धृ॥

साईहूनी मऊमऊ वाटे ती
झुरूझुरू झुरूझुरू धार काढिती
रूणुझुणु कंकण करिती गीती
का गान मनातील त्यात मिळे ॥१॥

अंधुक श्यामल वेळ, टेकडी
झरा, शेत, तरू मधे झोपडी
त्यांची देवी धार हि काढी
का स्वप्नभूमि बिंबुनी मिसळे ? ॥२॥

या दृश्याचा मोह अनावर
पाय ओढुनी आणि सत्वर
जादु येथची पसरे मजवर
का दूध गोडही त्याच मुळे ? ॥३॥