तुझ्या गळां, माझ्या गळां

तुझ्या गळां
माझ्या गळां
गुंफूं मोत्यांच्या माळा
ताई, आणखिं कोणाला ?
चल रे दादा चहाटळा ! ॥१॥

तुज कंठी
गज अंगठी !
आणखिं गोऽफ कोणाला ?
वेड लागलें दादाला!
मला कुणाचं ताईला ॥२॥

तुज पगडी
मज चिरडी !
आणखिं शेला कोणाला ?
दादा, सांगू बाबांला ?
सांग तिकडल्या स्वारीला ॥३॥

खुसूं खुसूं
गालि हंसू-
वरवर अपुलें रूसूं रूसू !
चल निघ, येथे नको बसूं
गह्र तर माझे तसू तसू ॥४॥

कशी कशी
आज अशी
गंमत ताईची खाशी !
अतां गडी फू दादाशी
तर मग गट्टी कोणाशी ? ॥५॥

1 thought on “तुझ्या गळां, माझ्या गळां

Comments are closed.