वकील आणि सरदार

एका राजाने आपला वकील दुसऱ्या राजाच्या दरबारी पाठविला. तो तेथे जाऊन पोंचल्यावर, तेथील राजाचे नोकर व वाजंत्री त्यांस मोठया सन्मानाने वाजतगाजत शहरात घेऊन जाऊ लागले. तो वकील कद्रू असल्यामुळे, वाजंत्रे आणि मिरवणूक यांसाठी विनाकारण पैसा खर्च व्हावा, हे त्यास बरे वाटले नाही. मग तो त्यांस म्हणाला, ‘अरे, माझी आई मेली, तिच्या सुतकांत मी असल्यामुळे हा सगळा थाटमाट तुम्ही बंद कराल तर बरे. ’ हे ऐकताच त्या लोकांनी आपापली वादये बंद केली. पुढे ही हकीकत तेथील सरदारास समजली, तेव्हा तो त्या वकिलापाशीं येऊन त्यास विचारतो, ‘वकीलसाहेब, आपल्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकून मला फार वाईट वाटले. आपली आई वारली, त्यास आज किती दिवस झाले बरे ?’ वकील उत्तर करितो, ‘त्या गोष्टीस आज चांगली चाळीस वर्षे होऊन गेली !’

तात्पर्य:- पैसा वांचविण्यासाठी चिक्कू मनुष्य वाटेल ती सबब सांगण्यास कमी करणार नाही.