वकिलाचा वकील

एक मनुष्य एका वकिलाकडे गेला व शेजाऱ्याकडून आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती त्याला देऊन म्हणाला, ‘या प्रकरणी जर मी न्यायालयात गेलो, तर शेजाऱ्याकडून मला नुकसान भरपाई दाखल पंचवीस हजार रुपये मिळतील का ?’
वकील म्हणाला, ‘तुझी बाजू एवढी न्यायाची आहे की, तुझं यश शंभर टक्के निश्चीत आहे. शिवाय शेजाऱ्यांकडून तुझं जे नुकसान झालं आहे, त्याची भरपाई म्हणून पचंवीस हजारांची गोष्टच काय करतोस ? मी तुला पन्नास हजार रुपये मिळवून देईन.’

वकीलाचा हा सल्ला ऎकताच, तो मनुष्य़ तिथून निघून सरळ चालू लागला. त्याला अशा तऱ्हेनं जाताना पाहून वकीलानं त्याला विचारलं, ‘काय रे ? तुझी बाजू एवढी न्यायाची असल्याचं व तुला यशाची खात्री असल्याचं मी सांगितलं असता, तू तुझ्या शेजाऱ्यावर करावयाच्या कायदेशीर कारवाईबद्दल काही एक न बोलता, असा निघून का चाललास ?’

यावर तो गृहस्थ म्हणाला, ‘वकीलसाहेब ! मी जी बाजू माझी म्हणून तुम्हाला सांगितली, ती शेजाऱ्याची होती. ज्याअर्थी शेजाऱ्याची बाजू एवढी न्यायाची आहे, आणि त्याला मी केवळ नुकसान भरपाईदाखल दहा हजार रुपये दिल्याने तो तडजोड करायला तयार आहे, त्या अर्थी हे प्रकरण मी त्याच्याशी बोलून न्यायालयाबाहेरच निकालात काढतो. पंधरा पंधरा वर्षे न्यायालयात खेटे घालण्याचा आणि वकिलाचे खिसे भरण्याचा मुर्खपणा मी कशाला करु ?’
एवढे बोलून वकिलाला फ़सविणारा जगाच्या पाठीवरचा तो पहिला गृहस्थ तिथून गेला, तो गेलाच.