वक्ता आणि श्रोते मंडळी

प्राचीन काळी ग्रीस देशात डिमेड्‌स या नावाचा एक मोठा वक्ता होऊन गेला. तो एके दिवशी एका सभेत भाषण करीत असता, सगळे श्रोते त्याच्या भाषणाकडे अगदी दुर्लक्ष करू लागले. त्यांचे लक्ष आपल्याकडे वळविण्याचा त्याने पुष्कळ प्रयत्न केला, परंतु परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. जवळपास काही मुले खेळत होती, त्यांचा खेळ पाहाण्यात सगळे श्रोते अगदी गढून गेले, मग डिमेड्‌स याने एक गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला, तो म्हणाला, ‘एकदा, बृहस्पति, एक मासा आणि एक चिमणी अशी तिघे प्रवासास निघाली.’ इतके शब्द कानी पडताच, सगळ्या श्रोत्यांनी आपले लक्ष्य त्याच्या भाषणाकडे लाविले व ते मोठया उत्सुकतेने ती गोष्ट ऐकू लागले. डिमेड्‌स पुढे म्हणाला, ‘प्रवास करता करता ती तिघेही एका नदीजवळ आली. मासा पोहून पलीकडे गेला व चिमणी उडून पलीकडे गेली. इतके बोलून त्याने पुनः आपले पूर्वीचे भाषण सुरू केले. त्यावेळी श्रोते मंडळीत एकच ओरड सुरू झाली, जो तो उठून त्यास विचारूं लागला, ‘अहो, मासा आणि चिमणी ही दोघे नदीपलीकडे गेली, एवढे तुम्ही सांगीतले, पण बृहस्पतिने काय केले ? तो कसा नदीपलीकडे गेला ?’ यावर डिमेड्‌सने उत्तर दिले, ‘बृहस्पति नदी उतरून गेलाच नाही. तो अदयाप नदीच्या काठी तसाच बसला आहे. त्याचे म्हणणे असे आहे की, लोक जेव्हा मूर्खपणाच्या गप्पागोष्टी ऐकण्याचे सोडून, महत्वाच्या विषयावरील भाषणे लक्षपूर्वक ऐकू लागतील, तेव्हांच आपण नदी उतरून जाणार.’

तात्पर्य:- महत्वाच्या विषयांवरील भाषणें ऐकण्यापेक्षा केवल मनोरंजक गोष्टी ऐकण्याकडेच सामान्य लोकांच्या मनाची प्रवृत्ति असते.