वस्त्रे

प्राचीन साहित्यामध्ये सुती, रेशमी व भरजरी कपड्यांचे उल्लेख विपुल प्रमाणात सापडतात. ऋग्वेदामध्ये जरतारी वस्त्राचा उल्लेख हिरण्यद्रपी म्हणून आला आहे. तर महाभारतामध्ये याचा उल्लेख मणिचिरा असा करण्यात आला आहे. यामध्ये जरतारी कामाबरोबरच माणिक-मोती व मौल्यवान हिरे गुंफण्याच्या नोंदी मिळतात. अशा प्रकारच्य मौल्यवान रेशमी वस्त्रांचा उल्लेख जैन साहित्यामध्ये पट्टा या नांवाने करण्यात आला आहे. आणि महाराष्ट्रातील मौल्यवान वस्त्रांचा विचार केल्यास महानुभाव साहित्यामध्ये पैठणच्या भरजरी उल्लेख आढळतो. पाश्चिमात्य प्रवाशांच्या नजरेतून अशा प्रकारची वस्त्रे व ही वस्त्रे निर्माण करणारी केन्द्रे सुटली नाहीत. एकंदरीत प्राचीन कालापसून भारतामध्ये अशा प्रकारची वस्त्रे निर्माण करण्याची परंपरा असल्याचे स्पष्ट होते.

पारंपारिक कलाकाराने निर्माण केलेली ही अमोल वस्त्रे प्रतिकूल अशा सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये टिकून राहिली यामध्येच त्यांचे मोठेपण दिसून येते. वैचित्र्यपूर्ण नक्षीकाम आणि उच्च पोत (texture)यामुळे जागतिक बाजारपेठातून भारतीय वस्त्रानी एकाधिकाअ प्रस्थापित केला. आणि दोन सहस्त्रकाहून अधिक काळ हा एकाधिकार अबाधित राहिला.

सुबक वीणकाम व त्यावरील गुंतागुंतीच्या विरंजन (bleaching)आणि रंगप्रकिया (dyeing) तसेच कोणत्याच प्रकारच्या आधुनिक तंत्राचा वापर न करता हाताने किंवा मागाचे सहाय्याने त्यावर नक्षीकाम करणे, हे युगानयुगांच्य परिश्रमाचे फलित मानावे लागेल. अशा प्रकारची कला ही सर्वसामान्यपणे आनुवंशिक असते. कठोर परिश्रम करण्याची तयारी, धंद्यावरील निष्ठा आणि परस्पर सहकार्याची भावना यामधून हे नैपुण्या साध्य होत असे. कला आनुवंशिक असल्याने धंद्यातील कसब बापातूनच मुलात उतरत असे. तसेच हा धंदाही पित्याकडून पुत्राकडेच जात असल्याने धंद्यातील जीवघेणी स्पर्धा टाळण्यास त्यामुळे मदत होत असे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत लेखामध्ये महाराष्ट्राच्या शतकानुशतकातील वस्त्रांचा इतिहास रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

या परैसरातील सातवाहनांच्या उदयाने सांस्कृतिक विकासाचे आगळे दालन खुले झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली येथील नागरीकरणास (urbanisation) गती प्राप्त होऊन तेर, नाशिक (गोवर्धन), भोगवर्धन, जुन्नर, कोल्हापूर (ब्रह्मपुरी) आदि नागरी केन्द्रांचा उदय झाला. सातवाहन घराण्यांनी या परिसरावर चार शतकाहून (230 इ.स. पूर्व व ते 23o इ,स,) अधिक काळ राज्य केले. सातवाहन काळात लाभलेले राजकीय स्थैर्य आणि आर्थिक सुबत्ता नागरीकरण प्रक्रियेस पोषक ठरली. तसेच सातवाहन सम्राट व्यापाराबाबत अतिशय दक्ष होते. त्यांनी देशान्तर्गत व्यापारात सुसूत्रता प्रस्थापित करताच परदेशीय व्यापाराची (विशेषतः पाश्चिमात्य देशांशी) जोरदार आघाडी उघडली. अल्पावधीतच त्यांनी ग्रीक व रोम येथील बाजारपेठा हस्तगत केल्या.

याच सुमारास (इ. स. ४५-४६ मध्ये) हिप्पोलसने मान्सून वाऱ्याचा (मौसमी वारे) शोध लावून त्याची व्यापारासाठीची उपयुक्तता पटवून दिली. त्यामुळे सातवाहनांच्या पश्चिमी व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हा सर्व व्यापार भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून होत असल्याने पश्चिम किनाऱ्याचे महत्त्व वाढले. आणि लवकरच या परिसराचे नागरीकरण होऊन तेथे भडोच, कल्याण, नालासोपारा, चौल आदि बंदरे उदयास आली. प्रस्तुत बंदरे सह्याद्री पर्वतातील घाटमार्गांनी देशावरील प्रमुख बाजारपेठाशी जोडली गेली. त्यामुळे देशभर व्यापाराचा विस्तार होण्यास मदत झाली.